देशाने एक विद्वान राजकारणी गमावला

0
99

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सिताराम येचुरी यांचे गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या कामापासून आपल्या सार्वजनिक आयुष्याला सुरुवात करणारे मार्क्सवादी व समाजवादी विचारांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेले नेते सिताराम येचुरी हे अतिशय विद्वान आणि आपल्या तत्वांशी कधीही तडजोड न करणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते, अशा शब्दांत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वराज्य अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे यांनी आदरांजली वाहिली.

आपल्या शोकसंदेशात कांबळे म्हणतात, सर्वसामान्य कार्यकर्त्याशीही अतिशय आपुलकीने संवाद करणे व सोप्या आणि सरळ भाषेमध्ये राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये त्यांना दोन वेळा निमंत्रित केले होते तेव्हा त्यांचा जवळून परिचय झाला होता. राज्यसभेतील त्यांची अनेक भाषणे सरकारला विचार करायला प्रवृत्त करणारी ठरली. त्यांच्या आकस्मित जाण्याने डाव्या आणि समाजवादी चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या विद्वत्तापूर्ण मार्गदर्शनाला देश आता मुकलेला आहे. अशा या विद्वान व डाव्या विचारांच्या प्रगल्भ नेत्याला “स्वराज अभियान’ महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व अखेरचा लाल सलाम!