पुण्यात गणरायाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याला भरधाव डंपरनं उडवलं; दोघांचा जागेवर मृत्यू

0
77

पुणे, दि. १३ (पीसीबी) : राज्यात अपघाताचे सत्र सुरुच असतानाच पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. अशातच आता मुळशी तालुक्यामधून पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. गुरुवारी (दि.12) गणपतीचे दर्शन घेऊन घरी परत जात असताना एका भरधाव वेगात जाणाऱ्या डंपर चालकाने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरात धडक दिली. यादरम्यान त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनिल काळू सूर्यवंशी आणि प्रिया अनिल सूर्यवंशी अशी मृत पावलेल्या पती-पत्नींची नावे आहेत. गुरुवारी मुळशी तालुक्यातील भूकंप परिसरामध्ये हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सूर्यवंशी आणि प्रिया सूर्यवंशी हे दोघे रात्री उशिरा गणपतीचे दर्शन घेऊन आपल्या दुचाकीवरून भूगाववरून भुकूमकडे परतत होते. त्याचवेळी एक डंपर चालक भरधाव वेगाने जात होता. या डंपरने सूर्यवंशीच्या दुचाकीला जोरात धडक दिली. पती-पत्नी दोघेही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. डंपर चालकाने या घटनेनंतर घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. त्यामुळे या पती-पत्नींना उपचार न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, अनिल आणि प्रिया यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अनिल सुर्यवंशी हा उरवडे रोडवरील खासगी कंपनीत नोकरी करत होते. तर त्यांची पत्नी प्रिया सुर्यंवशी भूगाव येथील एका कंपनीत कामाला होती. पुण्यातील गणपती पाहून परतताना त्यांचा अपघात झाला आहे. या घटनेत डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.