४५ टक्के नोकरदार महिला अविवाहित आणि निपुत्रिक राहतील

0
21

मुंबई, दि. १२ –
चूल आणि मूलच्या पलीकडे जाऊन महिलांनी त्यांची सामाजिक आणि कौंटुबिक चौकट मोडून अवकाश कवेत घेतलं आहे. पारंपरिक जोखडातून बाहेर पडून उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. कोणत्याही बंधनात राहण्यापेक्षा स्वतंत्र राहण्याकडे महिलांचा कल आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या सर्वेक्षणानुसार तर एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. २०३० पर्यंत २५ ते ४४ वयोगटातील जवळपास ४५ टक्के नोकरदार महिला अविवाहित आणि निपुत्रिक राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अविवाहित राहण्यास महिलांची पसंती का?
महिला आता त्यांच्या वैयक्तिक विकासाला आणि करिअरला प्राधान्य देतात. त्यामुळे त्या अविवाहित राहण्यास पसंती देतात. मध्यम वयात आल्यावर घटस्फोट घेण्याचं प्रमाणही वाढलं आहे. तसंच, पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेण्याची शक्यताही जास्त असते. पूर्वी महिला वयाच्या २०-३० वर्षात माता बनत होत्या. परंतु, आता आई होणं किंवा न होणं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक मुद्दा असल्याने या आई होण्याच्या निर्णयाला वेळ दिला जातो. नोकरीतील दगदग, वैयक्तिक आयुष्य आणि बालसंगोपनातील खर्चाचा विचार करून महिला माता होण्याचा निर्णय लांबणीवर टाकतात. हल्ली अधिक घरांमध्ये महिला या मुख्य कमवत्या घटक आहेत. तसंच, अनेक संस्थांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. यामुळे महिला करिअरच्या वाढीवर लक्ष केंद्रित करतात.

अविवाहित, निपुत्रिक महिलांच्या वाढीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अधिक स्त्रिया लग्नाला उशीर करणे किंवा न करणे आणि मुले होणे निवडत असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. २०३० पर्यंत, विवाह आणि पालकत्वाबाबत समाजाचे मतही बदलण्याची शक्यता आहे. यामुळे बालसंगोपन, कामाचे तास आणि समान वेतन यावरील अधिक प्रगतीशील धोरणे आखली जाऊ शकतात. यामुळे लिंगआधारित वेतनातील अंतर कमी करण्यात मदत होऊ शकते. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका येत्या काही वर्षांत अधिक स्पष्ट होईल.

गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये शैक्षणिक क्रांती झाल्याने महिला स्वतंत्र झाल्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून व्यावसायिक आयुष्यातही यशस्वी झेप घेत आहेत. परंतु, पीढी बदलत जाते तशी विचारप्रक्रिया आणि जीवनशैलीही बदलत जाते. विसाव्या शतकातील स्त्रियांसाठी नोकरी करणं ऐच्छिक होतं. एकविसाव्या शतकात महिलांनी नोकरी करणं गरजेचं बनलं आहे, तर पुढील काही वर्षांत महिला या सर्वाधिक कुटुंबाच्या मुख्य आर्थिक स्त्रोत असतील, यात काही शंका नाही. अर्थात याचा परिणाम विवाहसंस्थेवर होण्याची शक्यता आहे.