महागाईच्या मुद्यावर भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात राज्यभर पोस्टर्स

0
64

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : सणासुदीच्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून याची झळ राजातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजपच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. तस देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. भाजपच्या विरोधातील या पोस्टर मधे देवेंद्र फडणवीस यांचं व्यंगचित्र दाखवण्यात आलं आहे. तसंच ‘ तुम्ही उपाशी भाजप तुपाशी’ अशी टॅगलाईन देखील या पोस्टर्सवर लिहीण्यात आली आहे. मुंबईपासू संपूर्ण राज्यभरात ही पोस्टर्स लावण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने या पोस्टर्सद्वारे महागाईविरोधात सरकारला घेरण्यात आलं आहे. यामुळे आता भाजप वि. काँग्रेस अशी चांगलीच जुंपण्याची शक्यता दिसत आहे.

आगामी विधासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकार जोमाने कामाला लागलं आहे. विविध योजनांचा धडाका,जनसन्मान यात्रा, भूमीपूजन, उद्घाटन अशा विविध कामांद्वारे सरकारमधीले नेते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यात व्यस्त आहेत. तर राज्यातील गुन्हे, अपघात, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे, बदलापूरमधील मुलींवर झालेला अत्याचार, नागपूर हिट अँड रन अशा अनेक गुन्ह्यांवरून विरोधक रान उठवत आहेत. या मुद्यावरून ते सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

तुम्ही उपाशी भाजप तूपाशी … भाजप, देवेंद्र फडणवीसांविरोधात राज्यभरात पोस्टर्स !

हे कमी की काय म्हणून आता काँग्रेसतर्फे मुंबईसह संपूर्ण राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात पोस्टर्स लावण्यात आली आहेत. महागाईच्या मुद्द्यावर भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करणारी व्यंगचित्रे विविध शहरांमध्ये लागली आहेत. भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस जनतेला लुटणारे पाकीटमार असा हल्लाबोलही या पोस्टर्सच्या माध्यमांतून करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, हिंगोली, अहमदनगरसह राज्यभरात पोस्टर लागली आहेत. सणासुदीच्या काळात महागाईचा फटका बसल्याने जनतेचा संताप पोस्टर माध्यमातून व्यक्त होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तर भाजपच्या कार्यालयासमोरच ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. व्यंगचित्रातून सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड करणाऱ्या या पोस्टर्सची सध्या जनतेमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

मुंबईतलं पोस्टर फाडलंच
दरम्यान मुंबई प्रेस क्लबच्या समोर, अंधेरी पूर्व या भागासह संपूर्ण शहरभर अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. मुंबई पत्रकार संघाच्या बाहेरील रस्त्यावरील बेस्टच्या बसस्टॉपवर देखील एक पोस्टर लावण्यात आलं होतं. मात्र भाजप समर्थकांनी हे पोस्टर फाडून टाकल्याने भाजपला मिरच्या चांगल्याच झोंबल्याचं दिसत आहे.