लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई

0
37

पुणे, दि. १२ : गणेशोत्सवात घातक लेझर झोतांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली असतानाही दहीहंडी आणि गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. लेझर झोतांसाठी साहित्य पुरविणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला असून, आतापर्यंंत तीन मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

लेझर प्रकाशझोतांचा वापर केल्याप्रकरणी प्रभाकर पवार, हर्षद भालसिंग (३५), राकेश चौधरी (३२), गणेश यादव (३०, रा. फुरसुंगी), अजिंक्य ढमाळ (३३, भेकराईनगर), मनोज जगताप (३८, रा. धमाळवाडी), महादेव खापणे (३३, रा. कोल्हापूर), रोशन पाटील (रा. ससाणेनगर), आशिष चव्हाण (रा. हडपसर), अनिकेत जगताप (रा. ससाणेनगर), मोहंमद आशिक (रा. केरळ) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून लेझर झोत (बीम लाइट), ध्वनिवर्धक यंत्रणा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.