काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल,भाजप कधीही आरक्षण संपू देणार नाही- देवेंद्र फडणवीस

0
28

मुंबई,
दि. ११ (पीसीबी) : काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांनी आरक्षणावरुन केलेल्या विधानाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले. राहुल गांधींच्या या विधानावरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा या निमित्याने परत एकदा समोर आला आहे. राहुल गांधी आरक्षण संपवण्यासंदर्भात त्यांनी विदेशात एक वक्तव्य केले आहे. एक बाजूला निवडणुकीत खोटं नरेटिव पसरवायचे आणि दुसऱ्या बाजूला परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करायची, हे दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही.

बाबासाहेबांना कधी लोकसभेत निवडून जाऊ दिलं नाही. दोन वेळेला षडयंत्र करून बाबासाहेबांचा पराभव करणारा हाच काँग्रेस पक्ष आहे. मतांसाठी ते खोटे नरेटिव तयार करतात, हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. किंबहुना भाजपची भूमिका स्पष्ट आहे. भाजप आरक्षणाचे बाजूने असून भाजप कधीही आरक्षण संपू देणार नाही. असे मत व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केलं. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमचा आरक्षणाला विरोध नाही. काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिला आहे. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे, असं राहुल गांधी म्हणालेत. तसेच यात त्यांनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवलं जात आहे. माझा आरक्षणाला विरोध असल्याचं पसरवलं जात आहे. पण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये. तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.