वाकड, दि. १० : अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका वाहनचालकावर लोखंडी रॉड व कोयत्याने वार करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास रहाटणीतील शिवराजनगर येथे घडली.
विशाल नथू गायकवाड (वय ३०, रा. रहटणी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर पांचाळ (वय २०), करण उर्फ मुन्ना गजानन चोपवाड (वय २४, दोघे रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गायकवाड हे दुकानासमोर टेम्पो पार्क करून मित्रांशी बोलत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी आमच्या अंगावर चिखल का उडवला, असे विचारत तुला लय माज आला आहे का, तुला आज संपवूनच टाकतो, असे म्हणत कोयत्याने वार केले. तसेच, लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गायकवाड हे गंभीर जखमी झाले. फौजदार व्यंकट पोटे तपास करीत आहेत.










































