मद्यधुंद टेम्पो चालकाची सात ते आठ वाहनांना धडक, महिलेचा मृत्यू

0
28

पुणे, दि.९-: पौड फाटा येथे मद्यधुंद टेम्पो चालकाने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गीतांजली श्रीकांत आमराळे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील करिश्मा चौक ते पौड फाटा दरम्यान हा अपघात घडला. आशिष पवार हा टेम्पोचालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने सावरकर पुलाच्या दिशेने निघाला होता. दारुच्या नशेत त्याने करिश्मा चौकातील गाड्यांना धडक दिली. करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवार याने त्यांच्या अंगावर टेम्पो घातला. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वी गीतांजली अमराळे यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

दरम्यान, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टेम्पो चालक आशिष पवारला पोलिसांच्या स्वाधीन केले. अलंकार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.