विधानासभेसाठी गडकरी, फडणवीस, बावनकुळे, दानवेंचे मेगा प्लॅनिंग

0
115

मुंबई, दि. ६ : भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. आगामी विधानासभेच्या अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस , चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे या चतुर्भुजांवर विधानासभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

दरम्यान, येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचेही बोलले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले असल्याचेही बघायला मिळाले आहे. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे.

दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यातील सर्व जागांवर भाजपकडून विशेष मंथन करण्यात येत असून त्या अनुषंगाने भाजप तयारीला लागले आहे.