भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये २१ जागांवरुन घोडं अडलं

0
43

मुंबई, दि. ०३ (पीसीबी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत तीन-तीन पक्ष एकत्र असल्याने जागावाटपावरून दमछाक होताना दिसत आहे. एकीकडे महायुतीत अजित पवारांना सहभागी केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाचे कान टोचण्यात आले आहेत. तर दुसरीकडे आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडूनअजित पवारांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात जागावाटपावरून पेच निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरु आहेत. परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २१ जागांवरुन घोडं अडल्याची माहिती मिळत आहे. या २१ जागा त्याच आहेत जिथे २०१९ मध्ये दोन्ही पक्षांमध्ये बरोबरीची लढत बघायला मिळाली होती.२१ जागांमध्ये बहुतांश जागा ह्या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत आणि दोन्ही पक्ष या जागांवर दावा ठोकत आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पेटल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना एकमेकांच्या वैचारिक परंपरेचीही अडचण होत असल्याचे दिसून येत आहे.

कागल आणि इंदापूरच्या जागेवरून हर्षवर्धन पाटील आणि समरजित घाटगे तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच शाब्दिक वार सुरू आहेत.

आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

सोलापूरचे उत्तमराव जानकर आणि प्रशांत परिचारक हे सुद्धा बदलत्या समीकरणानुसार शरद पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे.