गोरक्षकांनी १२ वीच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून केली हत्या

0
38

हरियाणा, दि. ३ – गोमांस आणि गोतस्करीच्या कारणास्तव देशभरात विविध ठिकाणी मारहाणीच्या घटना घडत आहेत. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये गायींच्या तस्करीवरून २३ ऑगस्ट रोजी हरियाणामधील फरीदाबाद येथे पाच गोरक्षकांनी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या गाडीचा ३० किमीपर्यंत पाठलाग केला आणि त्याची गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी आता पाच जणांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आहेत. काही दिवसांपूर्वी हरिणामध्येच पश्चिम बंगालच्या एका मजुराचे गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मॉब लिंचिंग करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात ट्रेनमध्ये एका वृद्धाला गोमांस बाळगल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली.

आर्यन मिश्रा या १९ वर्षीय विद्यार्थ्याचा या घटनेत मृत्यू झाला. त्याच्यावर दोनवेळा गोळीबार करण्यात आला. २३ ऑगस्ट रोजी आर्यन मिश्रा आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी एका एसयुव्ही गाडीत रात्री घराबाहेर पडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अनिल कौशिक हा ‘लाईव्ह फॉर नेशन’ नावाची संघटना चालवतो. ही संघटना गोरक्षणाचे काम करते. अनिल कौशिक आणि इतर आरोपी वरून, सौरभ, कृष्णा आणि आदेश यांना गायीची तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. रेनॉल्ट डस्टर या गाडीतून तस्कार पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचही जण डस्टर गाडीच्या मागावर होते.

या माहितीनंतर आरोपींनी चुकून आर्यन मिश्रा आणि त्याचे मित्र ज्या डस्टर गाडीत बसले होते. त्या गाडीचा पाठलाग करून गोळीबार केला. यावेळी आर्यनला दोन गोळ्या लागल्या, अशी माहिती त्याचे वडील सिया नंद मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत दिली. प्राथमिक तक्रारीत गायींच्या तस्करीचा उल्लेख करण्यात आला नव्हता. आर्यनच्या एका मित्राच्या पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी, असा त्यांचा संशय होता.

पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये गोरक्षकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्यनच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आर्यन त्याचा मित्र हर्षित गुलाटी, सुजाता गुलाटी, शँकी, सागर गुलाटी आणि किर्ती शर्मा हे हर्षितच्या डस्टर गाडीतून फिरायला बाहेर पडले होते. याची कल्पना त्यांनी पालकांना दिली नव्हती. रात्री ३.३० वाजता हर्षितचे वडील आमच्या घरी आले आणि त्यांनी काहीतरी गडबड झाल्याचे सांगितले. आम्हाला पलवालला निघावे लागेल, असे त्यांनी सांगितले. माझा मुलगा अजय त्यांच्याबरोबर स्कुटीवर बसून पलवालला गेला. १० मिनिटांनंतर माझा मुलगा अजय परतला आणि मलाही त्याच्याबरोबर घेऊन गेला. आम्ही दोघेही बी. के. हॉस्पिटलला गेलो, मात्र तिथून आम्हाला एसएसबी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. तिथे गेल्यानंतर मी विचारले की, नेमके काय झाले आहे. तेव्हा मला सांगण्यात आले की, माझ्या मुलाला दोन गोळ्या लागल्या आहेत.