चिंचवडसाठी भाजपची जोरदार तयारी, पंकजा मुंडे शहरात

0
43

चिंचवड, दि. ०३ (पीसीबी) : शहरातील चिंचवड विधानसभेवर भाजपने सर्वाधिक लक्ष एकवटले आहे. मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे उद्या शहरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत काळेवाडी येथील आरंभ हॉलमध्ये मोजक्या १५० पदाधिकाऱ्यांची बैठक निमंत्रीत कऱण्यात आली आहे. निवडणुकिसाठी काय तयारी केली, काय केली पाहिजे यावर यावेळी विस्तृत चर्चा होणार आहे. स्वतः पंकजाताई कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. दरम्यान, निवडणुकिसाठी अनेकांनी परस्पर तयारी सुरू केल्याने पक्षांतर्गत गटबाजीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपने राज्यातील मोजक्या १६० मतदारसंघावर लक्ष दिले आहे, त्यात चिंचवड पहिल्या यादीत आहे. सर्व बड्या नेत्यांकडे प्रत्येकी २० प्रमाणे मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. चिंचवड साठी पंकजा मुंडे या निरीक्षक आहेत. उद्याच्या बैठकीत बूथ तापळीपासून सर्व तयारीचा आढावा त्या घेणार आहेत. पक्षाच्या संघटन स्तरावरची बैठक असल्याने चिंचवड मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सर्व शक्तीकेंद्र प्रमुख असे मिळून १५० पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण आहे.
दरम्यान, भाजपकडून आमदर अश्विनी जगताप यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते असे चौघे इच्छुक आहेत. उमेदवारी निश्चित नसताना चौघांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळणार असे समजून थेट प्रचार सुरू केल्याने संभ्रम वाढला आहे. आमदार अश्विनी जगताप या स्वतः निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत, तर दुसरीकडे त्यांचे दीर शंकर जगताप यांनी तयारी सुरू केली आहे. दोघांत समेट झाल्याच्या बातम्या येतात आणि नंतर पुन्हा दोघेही लढणार अशी चर्चा सुरू असते. शंकर जगताप यांना संधी दिलीच तर भाजपमधील १४माजी नगरसेवकांचा गट बंडाच्या पवित्रात असल्याने कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. काटे आणि नखाते यांनी गेल्या महिनाभरात मतदारसंपर्क अभियान तसेच रोजगार मेळावा, आरोग्य शिबीरातून प्रचाराची राळ उडवून दिली. जगताप कुटुंबातील उमेदवार असला तर भाजपमधूनच बंडाची भाषा सुरू आहे, तर दीर भावजयीच्या वादात ज्याला संधी मिळेल त्याच्या विरोधात महाआघाडीकडून दुसरा उमेदवार असणार अशीही चर्चा रंगल्याने पळापळ सुरू आहे.

महायुतीमध्ये जिथे ज्याचा आमदार तिथे त्या जागेवर तो पक्ष लढणार असे ठरलेले आहे. अशा परिस्थितीत चिंचवडची जागा भाजपकडे आहे. आता युतीचा प्रमुख भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून जेष्ठ नगरसेवर भाऊसाहेब भोईर यांनी कोणत्याही परिस्थिती निवडणूक रिंगणात मी असणार असा उघड पवित्रा घेत प्रचार सुरू केला आहे.