छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारणीत सर्वपक्षीय समिती गठित करा

0
98

-महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यापूर्वीच साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुतळा उभारण्यापूर्वी सल्लागार नेमण्यात येऊन त्यावरही कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. बोऱ्हाडेवाडी
विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर सदर निवडलेली जागा चुकीची आहे. सदर जागेवर जाण्याकरता रस्ता अरुंद आहे. पार्किंगची सुविधा पुरेशी उपलब्ध होऊ शकत नाही. पुतळ्याशेजारी टोलेजंग इमारती आहेत. त्यामुळे पुतळ्याच्या सौंदर्याला बाधा पोचू शकते तसेच पुतळ्याला यामुळे अडसर निर्माण होईल. त्याचप्रमाणे सदर निवडलेली जागा मुख्य रस्त्यापासून आत आहे. अशा मुख्य बाबी सामाजिक संघटना, नागरिक, इतिहास प्रेमी तसेच
राजकीय पक्षांनी निदर्शनास आणून देत सदर ठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी विरोध केला होता. मात्र राजकीय श्रेयवाद लाटण्यासाठी आणि स्टंटबाजीमध्ये त्याच जागेवर पुतळा उभा करण्याचे काम रेटून नेण्यात आले आणि चौथऱ्याचे काम देखील सुरू करण्यात आले

महाविकास आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शनिवार, 31ऑगस्ट रोजी पिंपरी येथे मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या उभारणीमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामथे, काँगेस शहराध्यक्ष कैलास कदम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर संघटीका सुलभा उबाळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे,
माजी नगरसेवक रवी लांडगे, सुलक्षणा शिलवंत, विनायक रणसुभे, कुणाल तापकीर, देवेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेमध्ये पुतळा उभारणी संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी सुरवातीला विनायकनगर या जागेवर चौथरा उभारण्याचे काम में धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला दि. 16 मार्च 2020 ला 12.50 कोटी रुपयाला देण्यात आले. सदर कामाची मुदत ही १८ महिने होती. वेळेत काम झाले नाही म्हणून पुन्हा 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुरत वाढ देण्यात झाली. आजपर्यंत 40%, काम पुर्ण झाले त्याचे 5.50 कोटी रुपये बिल ठेकेदाराला अदा झाले आहे.

त्यांनतर जागेमध्ये बदल करण्याचे ठरले. मग झालेल्या 5.50 कोटी रूपये खर्च याला जबाबदार कोण ?हा प्रश्न उभा राहिलेला असतानाच दुसरा पुतळा उभारण्याचा घाट म्हणजे थोडक्यात झालेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न आहे. आता नव्याने होणाऱ्या खर्चाचा आकडा मात्र गुलदस्त्यात ठेवण्याचा खटाटोप सुरू आहे.

नवीन जागी पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी पीएमआरडीएकडे करण्यात आली. पीएमआरडीए हा शासनाचाच भाग असताना सुद्धा सदर जागेसाठी त्यांनी 49 कोटी 74 हजार 272 रुपयांची मागणी केली आहे. सदर जागा आज ताब्यात दिलेली असली तरी भविष्यात या जागे पोटी एक रुपयाही देण्यात येऊ नये.अशी आमची आग्रही मागणी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या जागेमध्ये पुतळा उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर या जागेत चौथरा उभा करण्यासाठी पुन्हा पंधरा कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली.यासाठी ठेकेदाराशी संगणमत करण्यात आले.नियम व अटी शर्ती लागू करताना ठेकेदार डोळ्यासमोर ठेवण्यात आला. त्यामुळे नवीन जागेवर पुतळा उभारताना पुन्हा धनेश्वर कन्स्ट्रक्शन याच ठेकेदाराला चौथरा बांधण्याचे काम देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करणाऱ्या राम सुतार या दिल्ली येथील शिल्पकाराला 32 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आजपर्यंत या ठेकेदाराला महापालिकेतून 22 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.

नुकतीच माहिती घेतली असता छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे वेगवेगळे भाग जे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये आलेले आहेत. ते एकत्र जोडणीनंतर पुतळा उभा राहणार आहे .त्या भागापैकी महाराजांच्या “मोजडी’ हा जो स्वतंत्र भाग मोल्डिंग करून तयार करण्यात आलेला आहे. त्यास तडा गेल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच पुतळा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या धातू बद्दल शंका उपस्थित होण्यास वाव आहे. आयआयटी या संस्थेकडून प्रमाणभूत केलेला धातूच संपूर्ण पुतळ्यासाठी वापरण्यात आला आहे का अशीही शंका यामुळे उपस्थित होत आहे. याची शहानिशा होणे गरजेचे आहे.

आजपर्यंत पुतळा उभारणीच्या कामांमध्ये तब्बल 40 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.मूर्तिकार त्यांचे काम पूर्ण आहे फक्त जोडणी बाकी असून चौथरा बांधून झालेला नाही असे सांगत आहेत. मग यामध्ये नेमकं कोण चुकत आहे हे शोधणं गरजेचं आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली घटना लक्षात घेऊन तशी चूक आपल्या शहरात होऊ नये म्हणून शिवप्रेमी खासदार डॉ. अमोल कोल्हे, इतिहास प्रेमी, संशोधक व अभ्यासक या सर्वांची मिळून एक समिती गठित केली जावी अशी आमची आग्रही मागणी आहे