महाराष्ट्राची भळभळती जखम… -मधुकर भावे

0
63

गेला संपूर्ण आठवडा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. एका पाठोपाठ एक, अशा काही लाजीरवाण्या, संतापजनक आणि मनाला इंगळ्या डसाव्यात अशा घटना घडल्या. त्यामुळे या अस्वस्थ महाराष्ट्राचा तडफडाट झालेला आहे. शिवछत्रपतींच्या पुळ्याची जी विटंबना झाली त्यामुळे तर महराष्ट्राच्या हृदयाच्या चिंधड्या झाल्या. चार लाख एवढे सैन्य असलेल्या औरंगजेबाच्या पुढे जो स्वाभिमानी राजे झुकले नाहीत… अपमान झाल्यावर औरंगजेबाला पाठ दाखवून दरबारातून निघून गेले… आणि अग्र्याच्या कैदेतून शिताफिने निसटले ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोसळून पडणे ही कल्पनाच महाराष्ट्र सहन करू शकत नाही. त्यानंतर त्याची जी चित्र प्रसिद्ध झाली ती पाहताना हृदय विदर्ण व्हावे, अशी स्थिती होती. ते सोशल मिडीयारील व्हायरल होणारे फोटो नंतर थांबवले म्हणून बरे झाले… पण, महाराष्ट्राच्या मनाला बसलेला धक्का हा अस्वस्थ करणारा आहे…. त्या आगोदर बदलापूरमध्ये घडलेला भयानक प्रकार… अंबरनाथमधील किळसवाणा प्रकार आणि पोलीस स्टेशनमध्ये ‘पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला’ या सगळ्या तीन दिवसांच्या वाईट घटनेनंतर महाराष्ट्रातील मालवणच्या राजकोट येथील महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याने भळभळा जखम व्हावी, अशी स्थिती झाली. छत्रपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. असा राजा जगात झालेला नाही. त्या स्वाभिमानावर महाराष्ट्र ताठ मानेने उभा राहतो… त्या पुतळ्याच्या घटनेनंतर काही अत्यंत चुकीच्या गोष्टी घडल्या. याविषयात कोणीही राजकारण आणता कामा नये, पण घडलेल्या भयानक प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नव्हते. हे पहिले निरिक्षण…. विषय किती गंभीर आहे याची सुरवातीला ना मुख्यमंत्र्यांना जाणीव झाली… ना सरकारला झाली… मुख्यमंत्र्यांनी समुद्राच्या ताशी ४५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे म्हटले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तर पुतळ्याच्या लोखंडी सळ्या खाऱ्या वाऱ्यामुळे गंजल्या, असा शोध लावला… म्हणून पुतळा कोसळला… कोणी काही आणि कोणी काहीही कारणे सांगत राहिले… त्यामुळे महाराष्ट्राच्या भडकलेल्या मराठी मनाचा उद्रेक जेव्हा तीव्र झाला. त्यानंतर चार दिवसांनी सरकारतर्फे माफी मागण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली… त्याआगादेरच अिजतदादांनी माफी मागून टाकली होती. फडणवीसांनी अजून खेदही व्यक्त केला नाही… माफीही मागितली नाही… पंतप्रधानांनी पालघरच्या कार्यक्रमात माफी मागितली… झालेल्या चुकीबद्दल ही माफी होती…. चुकीला माफी असू शकते… पण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला ती ‘चूक’ होती की तो भयंकर ‘गुन्हा’ होता? पुतळा कोसळण्याची कारणे चुकीमध्ये आहेत की चुकीच्या लोकांच्या हातात हे काम दिल्याचा गुन्हा घडल्यामुळेच आहेत? ‘लोकसभा निवडणुकीच्या आगोदर घाई घाईने पुतळ्याचे उद्घाटन झाले पाहिजे,’ असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तज्ञाांकडून पुतळ्याच्या मजबुतीची खात्री मिळण्या आगोदरच उद्घाटन केले गेले.. त्यामुळे दिसायला ही ‘चूक’ वाटली तरी यात मोठा गुन्हा घडलेला आहे. चुकीला माफी मान्य होऊ शकते…. पण, गुन्ह्याला माफी असू शकत नाही…. गुन्ह्याला शिक्षाच असते… आता चौकशी समिती बसली आहे… त्याचा अहवाल काय येणार? कसा येणार? कधी येणार.. याच्या तारखा जवळजवळ ठरल्याच आहेत…. विधानसभा निवडणुका झाल्याशिवाय त्याचा अहवाल येणार नाही… ज्याला पुतळ्याचे काम दिले होते, त्याचा अनुभव काय होता? त्याने स्वत:च सगळे कथन केले आहे…. एक-दोन फुटाचे पुतळे तयार करणाऱ्याला हे काम कुणी दिले? हा गुन्हा कोणाकडून झाला… हे महाराष्ट्राला समजले पाहिजे…. पुतळा करणारा जो कोणी आपटे आहे… त्याने यापूर्वी केलेल्या पुतळ्यांची खात्री कोणी करून घेतली होती की नाही? याशिवाय या देशात आणि महाराष्ट्रात जे प्रचंड पुतळे उभे राहिले आहेत ते कधी आणि कोणी बनवले आणि किती वर्ष टिकले आहेत… त्यातील अनुभवी लोक कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण करतो आहोत, त्याची उभारणी मालवणच्या समुद्र किनारी होणार आहे… तिथले हवामान… वादळ… वारा… या कशाचाही अभ्यास न करता, ज्या घाई-घाईने हे सगळे काम उरकण्यात आले ती ‘चूक’ म्हणताच येणार नाही.. हा गुन्हाच घडला आहे… निवडणुकीच्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर करता येईल, हा यातील उघड उघड हेतू होता… आजपर्यंत निवडणुकीत गंगा नदी वापरून झाली…. प्रभू रामचंद्र वापरून झाले… देवधर्माचा वापर झाला… आता महाराष्ट्राच्या दैवताचा वापर करण्यासाठीच हा पुतळा घाईने तयार झाला…. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणात नेमके दोषी कोण? आणि त्याची शिक्षा काय होणार… याचे उत्तर महाराष्ट्राला मिळायलाच हवे… चौकशी समितीचा अहवाल कधी येईल…. नवीन पुतळा उभा राहिल…. या सगळ्या नंतरच्या गोष्टी… पण, घडलेली घटना महाराष्ट्रावर केवढा आघात करून गेली आहे, याची राज्यकर्त्यांना कल्पना नसेल तर त्यासारखे दुर्दैव नाही… किंबहुना या प्रकरणाचे गांभीर्य या सरकारला पहिल्या दिवशी कळलेच नाही… आणि म्हणून गेला सगळा आठवडा असा महाराष्ट्राच्या भाव-भावना उद्धवस्त करणारा आहे, हे कृपाकरून समजून घ्या… लोकांची आठवण कमी असते… लोक सगळं विसरून जातील…. हे ही खरे आहे… त्या आधारावरच चौकशी समिती वेळ काढणार… माफी मागून झाल्यामुळे लोकांचा राग शांत होणार… हे सगळे झाल्यावरही महाराष्ट्राच्या दैवतावर अशी वेळ येणे ही घटना महराष्ट्र विसरू शकतो का? आणि झालेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली नाही तर हे चौकशीचे एक फार मोठे ढोंग महाराष्ट्रात झाले, असा इितहास लिहिला जाईल…. फार वाईट घडलेले आहे. त्याची कारणे देत बसू नका… या आपटेकडे हे काम दिले कुणी? जर चूक नाही आणि गुन्हा नाही तर आपटे फरार का झाला? का त्याला कुणी फरार केला आहे? आमचे मुंबई- महाराष्ट्राचे पोलीस दल इतके सक्षम आहे की, या फरार आपटेला पाचच मिनीटांत ते शोधून काढतील… पण, त्यांचे हातही बांधले गेले असतील… नक्की काही तरी दबाव असेल… त्या दबावामुळेच आपटे ‘फरार’ असल्याचे सांगितले जात आहे. हा विषय किती गंभीर आहे, हे सरकारने जरा समजून घ्यावे… त्याचे काय परिणाम होणार आहेत, याचा विचार करावा…. विरोधी पक्षाने यात राजकारण आणू नये, तसे सरकारनेही ‘आपटे कोणाचा’? असला फालतू विचार करून जर दडपा-दडपीचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील लोक लाखो डोळ्यांनी काय चालले आहे ते पाहात आहेत. हे लक्षात ठेवा… आणि त्याचे गांभीर्य समजून घ्या…. पंतप्रधानांनी माफी मागितली म्हणून विषय संपेल, असे समजू नका… या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील…
या महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असे पुतळे दिमाखात वर्षानुवर्षे महाराष्ट्रात उभे आहेत. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत लोकमान्य टिळक गेली ९६ वर्षे गिरगाव चौपाटीवरच उभे आहेत… त्या पुतळ्याकडे पाहात कवी कुसुमाग्रज यांनी उभ्या-उभ्या कविता लिहिली… आणि ‘विशाखा’ काव्यसंग्रहात छापली…

ती धीट मराठी मूर्ती कणखर ताठ
आदळतो जी वर अजून पश्चिम वात..
ती अजिंक्य छाती… ताठर… अन रणशील
जी पाहून सागर… थबके… परते आत… ’

तो लोकमान्य टिळकांचा पुतळा शिल्पकार आर. के. फडके यांनी साकारलेला आहे…. फडणवीस साहेब, तो पुतळा आजही ९६ वर्षे खारा वाराच झेलत आहे… त्याच गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेल यांचा पुतळा बाजूलाच उभा आहे… पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा विनायक पांडुरंग करमरकर या शिल्पकाराने साकारला… कोल्हापूर येथील दसरा चौकातील शाहू महाराजांचा पुतळा गणपतराव म्हात्रे या शिल्पकाराने उभारला…. आज कित्येक वर्षे हे पुतळे ताठ मानेने उभे आहेत… कुपरेज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आज कित्येक वर्षे संविधान सर्वश्रेष्ठ असल्याची ग्वाही देत आहे. शिर्डी येथील साईबाबांची भव्य मूर्ती शिल्पकार बालाजी तालीम यांनी बनवली…. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा शिल्पकार विनायक करमरकर यांनीच उभा केलेला आहे… असे एक से एक दिग्गज शिल्पकार या महराष्ट्रात असताना आणि आजही त्यांचे वारसदार तेवढेच वाकबगर असताना, शिवछत्रपतींच्या मालवण येथील पुतळयासाठी ‘हा आपटे’ कोणी शोधून काढला? फडणवीस यांनी त्याची माहिती द्यावी… एखाद्या रहस्यकथेसारखी ही गोष्ट वाटते…. संशय त्यामुळेच वाढलेला आहे. उद्या मुंबई उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जर एखाद्या शिवभक्ताने ‘जनतहित याचिका’ दाखल केली तर…. काय प्रसंग ओढवेल?
गेट वे अॅाफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ जानेवारी १९६१ रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि तो पुतळा उभा करण्यात बाळासाहेब देसाई यांचा पुढाकार होता. शिवाजी पार्क येथील शिवछत्रपतींचा पुतळा शिल्पकार प्रभाकर पानसरे यांनी बनवला… तो पुतळाही बाळासाहेब देसाई यांनी स्थापन केलेल्या शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे उभा झाला… विधान भवन आवारातील महात्मा फुले यांचा ब्रांझचा पुतळा श्री. सोनवडेकर या शिल्पकाराने बनवलेला आहे… आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाताना छत्रपतींचा उभा असलेला पुतळा हा शिल्पकार शरद कापूसकर यांनी बनवलेला आहे… ते शिल्पकार कापूसकर आज जिवंत आहेत. त्यांना कधी कुणी विचारले का? जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या समितीमधील सदस्यांना अनेक दशके उभे राहिलेले पुतळे कोणी उभारले? याची माहिती असायला हवी. मालवण येथील महाराजांचा पुतळा उभा करताना याची चर्चा का झाली नाही…? नौदलाने पुतळ्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली असती… नौदलाकडून हा पुतळा आपटे याला बनवायला द्यायची भूमिका कोणाची? तो आदेश कोणी दिला..? महाराष्ट्राला ही सगळी माहिती मिळायला पाहिजे… का नौदलाने परस्पर आपटेला शोधून काढला…? आता कोणत्याही थापेबाजीने महाराष्ट्राला कोणीही फसवू शकणार नाही. मुख्यमंत्र्यांनी १०० वेळा माफी मागितली. ती माफी त्यांनी मनापासून मागितली आहे… पण हे काम आपटे याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडून गेलेले नसावे…. ते काम आपटेला कोणी दिले? हा मुख्य मुद्दा आहे. फडणवीस का बोलत नाहीत? एकूणच सगळा विषय माफीवर संपेल, अशी स्थिती नाही… निवडणुका समाेर ठेवून मी हे अजिबात लिहित नाही…. गेल्या ६५ वर्षांत अशा अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या… अनेक अहवाल आले आणि गेले… अनेक घटनाही घडल्या आणि लोक विसरलेही… पण, शिवाजी महाराजांचा विषय हा इतक्या हलक्या पद्धतीने घेऊ नका… निवडणुकीशी तर हा विषय अजिबात जोडू नका… तुमची ‘लाडकी बहिण’ तुमचं काय बरं-वाईट करायचे ते करील… तुमच्या अंतर्गत मारामाऱ्या तुम्ही कशाही करा… आता मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्र्यांनी सांगून टाकले की, ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबर नाईलाजाने कॅबिनेटमध्ये बसावे लागते…. कॅबिनेटनंतर बाहेर आल्यावर उलटी होते….’ ज्यांना उलटी होते ते आरोग्य मंत्री आहेत… त्यांची प्रकृती बिघडली तर महाराष्ट्राच्या प्रकृतीचे काय होणार? तेव्हा आता पुढच्या कॅबिनेट बैठकीला मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांना आपल्या बाजूला बसवावे… आणि आलेपाकची वडी खायला द्यावी.. त्यांची उलटी थांबेल… अरे महाराष्ट्रात काय घडते आहे…. आणि मंत्रिमंडळातील माणसं काय बोलतात…. कोणाला कशाचे काही पडलेले नाही, अशा वातावरणात हे जे काही चाललेले आहे, हे महाराष्ट्राच्या नशिबी येईल, असे कधीही वाटले नव्हते. म्हणून गांभीर्य समजून घ्या… आणि त्या गांभीर्याने शब्द वापरा…. लोकांना एवढे गृहित धरू नका…
बदलापूर…. किंवा तत्सम अत्याचाराच्या घटना याबद्दलचा आक्रोश तीव्र आहेच…. पण, महाराजांच्या बाबतीत जे काही घडले, ती जखम अधिक खोल आहे. विरोधी पक्षालाही जरूर हे सांगायला हवं की, उद्या त्यांचे जे ‘जोडे मारो’ आंदोलन आहे ते गंभीर विषयाला शोभेल असे वाटत नाही… ज्या दिवशी पुतळा कोसळला त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यात हजारो माणसं तालुका कचेरीवर मौन पाळून आपला संताप व्यक्त करायला रस्त्यावर उतरली असती तर त्याचा परिणाम अधिक झाला असता… मालवण बंद होऊ शकले… पण छत्रपतींच्या पुतळ्याबाबत झालेल्या या घटनेला फक्त ‘मालवण बंद’ करून आपण प्रतिकात्कम निषेध केला. महाराष्ट्रात त्या दिवशी तसाच बंद केला असता तर तो अधिक प्रभावी ठरला असता. आता ‘जोडे मारो’ आंदोलन आहे ते जोडे कोणाला मारायचे….? खरी गोष्ट अशी आहे की, पूतळा कोसळल्याचे ऐकल्याबरोबर आपणच आपल्या कानफटात मारून घ्यावी, एवढी महाराष्ट्रासाठी ही शरमेची गोष्ट आहे. पण अशा ‘जोडे मारो’ अशा आंदोलनाने विषयाचे गांभीर्य टिकेल, असे वाटत नाही… बदलापूरच्या घटनेतंर पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ ही हाक मागे घ्यावी लागली होती. विरोधी मित्रांनी याचा विचार करायला हवा…
– सध्या एवढेच