आगामी सण, उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज – पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे

0
105

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) : आगामी सण, उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावर लोकप्रतिनिधी आणि मध्यवर्ती शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना आश्वस्त करताना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आगामी सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज असल्याचे सांगितले.

या बैठकीसाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे व शांतता कमिटी सदस्य उपस्थित होते.

शांतता समिती बैठकीमध्ये आमदार अमित गोरखे म्हणाले, “चांगल्या शाळांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करावे. डीजे आवाजाचा महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. रुममध्ये गणपती बसवतात त्यावर पोलीसांचे कंट्रोल असले पाहिजे.” आमदार उमा खापरे यांनी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत महिला एकटी असेल तर पोलीसांची मदत घ्यावी. रात्री भगिनींना घरी पोहचवण्यासाठी मदत घ्यावी असे पोस्टर लावावेत, अशी सूचना केली. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत लोक दारु पिऊन येतात. त्यांच्यावर पोलिसांची निगराणी हवी. प्रशासनाने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करावी. मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. गणेश विसर्जनासाठी कृत्रीम तलाव तयार करण्याबाबत मुद्दे उपस्थित केले.


नागरिकांचे सहकार्य मिळावे

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले, “मागील काळात सण उत्सवा दरम्यान सर्व पिंपरी चिंचवडकरांचे सहकार्य मिळाले. तसेच नागरीक शांतता कमिटी सदस्य यांचे बहुमोल सहकार्य लाभले. यापुढेही सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो. आमदार यांनी गणेश उत्सव स्थापना, विसर्जन, वाहतूक नियोजन, गर्दी नियोजनाबाबत उपस्थित केलेल्या मुद्दयांबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. नागरिकांनी एक गाव एक गणपती असे उपक्रम राबवावेत. ज्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे तिथे मनुष्यबळ वाढवले आहे. ईद ए मिलाद सणाचे अनुषंगाने चांगले सहकार्य मिळावे तसेच इतर सर्व गोष्टीबाबत काही वाटल्यास माहिती दयावी असे त्यांनी सांगितले.


गैर प्रकारांना पोलीस आळा घालणार

आगामी गणपती, गणेश विसर्जन अशा आगामी सर्व सणांसाठी पोलीसांच्या बैठका सुरु आहेत. यामध्ये गर्दीचे नियोजन, वाहतुक व्यवस्था व मंडळांवर नियंत्रण याचे नियोजन करण्यात येत आहे. याबरोबरच गर्दीच्या काळात सोनसाखळी चोरी, वाहन चोरी किंवा इतर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा डोळयात तेल ओतून काम करणार आहे. नागरीकांनी याकाळात कोणताही गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यास पोलीसांना कळवावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.


गणेशोत्सवात कडेकोट बंदोबस्त

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दीड दिवसांचे तसेच पाच, सात, नऊ आणि दहाव्या दिवशीही गणेश मुर्तीचे विसर्जन केले जाते. त्यांमुळे शहर व परिसरात उत्सवकाळात विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी मिरवणुक मार्ग व विसर्जन घाटांवर मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत मंडळांनाही आवश्यकतेनुसार बंदोबस्तसाठी स्वतंत्र पेालीस अधिकारी व कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दीड हजार पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली आहे. यात काही मंडळे परवानगी न घेताही गणेशोत्सव साजरा करतात. तसेच काही हाउसिंग सोसायटी, कंपन्या यांच्या कडून देखील गणेशोत्सव साजरा केला जातो. हा गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली असल्याचेही आयुक्त चौबे यांनी सांगितले.