मावळ तिहेरी हत्याकांड प्रकरणात सहभागी असलेल्या पाचव्या महिलेला अटक

0
55

तळेगाव, दि. ३० (पीसीबी) : गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह मावळ तालुक्यातील इंदोरी येथे आणण्यात आला. दरम्यान तिची दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागल्याने आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राने दोन्ही मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिले. तसेच महिलेचा मृतदेह देखील इंद्रायणी नदीत फेकला. आजवर या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. आता आणखी एका संशयित महिलेला गुरुवारी (दि. 29) अटक करण्यात आली आहे.

कविता शैलेंद्र गायकवाड (वय 37, रा. अहमदनगर) असे गुरुवारी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. वराळे, तळेगाव दाभाडे), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. अहमदनगर), डाॅ. अर्जून शिवाप्पा पोळ (वय 69, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) तसेच उषा निवृत्ती बुधवंत (वय 35, रा. कोपरखैरणे) यांना अटक केली आहे. समरीन निसार नेवरेकर (वय 25) आणि ईशांत (वय 5), इजान (वय 2) अशी हत्या झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र दगडखैर याने 6 जुलै रोजी समरीन नेवरेकर हिला गर्भपात करण्यासाठी मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत कळंबोली येथे पाठविले. दरम्यान, रुग्णालयात गर्भपात सुरू असताना समरीन हिचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी आपसात संगनमत करून 9 जुलै रोजी समरीनचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही लहान मुलांना तळेगाव जवळील वराळे येथे आणले.

इंद्रायणी नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा ‘प्लॅन’ त्यांचा ठरला. त्यानुसार, इंद्रायणी नदीत समरीनचा मृतदेह फेकला. आईला फेकल्याचे पाहून दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. त्यामुळे नराधम संशयितांनी दोन्ही मुलांना देखील जिवंतपणे नदीत फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र, रविकांत, तसेच गर्भपात करणारा डाॅक्टर अर्जून पोळ आणि गर्भपातासाठी मध्यस्थी करणारी महिला उषा बुधवंत यांना अटक केली.

तपासासाठी एसआयटीची स्थापना

पोलिसांनी समरीन आणि तिच्या मुलांचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. पथकाने तळेगाव ते उजनी धरणापर्यंत इंद्रायणी नदीकाठच्या सर्व पोलीस ठाण्यांना मृतदेह शोधण्याबाबत माहिती दिली. मात्र, शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी संशयितांच्या अहमदनगर येथील मूळगावी शोध घेतला. शेतात आणि इतर काही ठिकाणी मृतदेह पुरले असण्याची शक्यता व्यक्त करत जेसीबीच्या साह्याने खोदून मृतदेहांचा शोध घेण्यात आला. मात्र, मृतदेह मिळून आले नाहीत.

बोलण्यात तफावत, संशयित महिलेला अटक

विशेष तपास पथकाने या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या काही संशयित व्यक्तींकडे चौकशी केली. त्यामध्ये रविकांत याची मैत्रीण कविता गायकवाड हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिच्या बोलण्यात तफावत आढळली. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हत्येच्या या कटात तिचा सहभाग असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे.