मनोज जरांगेंचा इशारा, ११३ आमदार पाडणार

0
43

अंतरवाली सराटे, दि. २९ –  मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यांच्याकडे अनेकांनी अर्ज केला आहे. 800 हून अधिक अर्ज त्यांच्याकडे आले आहे. इच्छुकांची जणू रांगच लागली आहे. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही 288 उमेदवार पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे प्रत्येक भाषणात 288 उमेदवार पाडणार असल्याचं बोलत होते. पण आता त्यांनी हा आकडा बदलला आहे. जरांगे यांनी आता नवा आकडा दिला आहे. नव्या आकड्यानुसार जरांगे आता फक्त 113 उमेदवार पाडणार आहेत. जरांगे यांनी नवीन आकडा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जरांगे यांनी यूटर्न घेतला का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी हा नवा आकडा दिला. राजकीय निर्णय घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली आहे. त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. उमेदवार पाडायचे की निवडणूक लढवायची याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. पुढच्या राजकीय बैठकीतच हा निर्णय होईल. तालुक्याच्या ठिकाणीही आमच्या बैठका होत आहेत. मराठवाडा आणि विदर्भात आम्ही घोंगडी बैठका घेणार आहोत. आम्ही एक आहोत. हे कुणाला दाखवण्याची आता गरजच उरलेली नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

प्रश्न कसा मार्गी लागत नाही ते पाहतो
मराठा, मुस्लिम आरक्षण आणि शेतकऱ्यांचा प्रश्न कसा मार्गी लागत नाही ते आम्ही पाहणार आहोत. हे प्रश्न मार्गी लागले नाही तर लोकांनी यांना 2024 च्या निवडणूकित दाखवून द्यावे. कुणाला पाडायचं ते वेळेवर सांगू . बैठकीत ठरवू द्या. आरक्षण नाही दिल तर यांचे 113 गेले म्हणून समजा, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

एकमेकांना भेटल्याशिवाय होत नाही
ओबीसी आणि मराठा समाजात कुठेही कटुता नाही. आम्हाला दररोज एकमेकांना भेटल्याशिवाय होत नाही. भुजबळ हा त्याच्या राजकिय स्वार्थासाठी ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद असल्याचं भासवत आहे. पण महाराष्ट्रातील जनता सत्य स्वीकारणार. आज आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणून आम्ही चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लढा मॅनेज होत नाही
समाज एक आला हे महत्वाचे आहे. समाज एक झाला की खुंटे उपटनं अवघड नाही. हा लढा मॅनेज होत नाही. भुजबळांनी कितीही खुंटे ठोकले तरी उपटून फेकू. समाज एक झाला हे महत्वाचे आहे. माझा मालक माझा मराठा समाज आहे. समाज एकत्र आल्याने प्रश्न सुटत आहे, असंही ते म्हणाले.