कोंढव्यात एटीएस चा छापा,‘बनावट टेलिफोन एक्सचेंज’चा पर्दाफाश

0
63

पुणे, दि. २९ (पीसीबी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा भागात मोठी कारवाई केली आहे. या भागात बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या ‘बनावट टेलिफोन एक्सचेंज’चा पर्दाफाश करण्यात आला आहे. याठिकाणावरुन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्डसह संत सीम बॉक्स, वायफाय आणि सीमबॉक्स चालवण्याकरिता लागणाऱ्या अँटिना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे.

नौशाद अहमद सिद्धीकी (वय २२, रा. कोंढवा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा वापर केला जात होता. त्याकरिता या सीमकार्डचा वापर केला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा येथील मीठानगरमध्ये असलेल्या ‘एमए कॉम्प्लेक्स’ परिसरात हे बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर चालवले जात होते. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या नौषादकडे कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

त्याने हे सीमकार्ड कुठून आणले? त्याला कोणत्या वितरकाने हे सीमकार्ड पुरवले, भारतीय यंत्रणांना विदेशातून येणारे कॉल समजू नयेत याकरिता वापरली जाणारी यंत्रणा त्याने कशी उभी केली? त्याने याचे प्रशिक्षण कुठे घेतले? त्याला या कामासाठी कोणी कोणी आर्थिक मदत केली? कोंढवा येथे जागा कोणी व कशी दिली? ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाची पार्श्वभूमी काय आहे याबाबत कसून तपास केला जात असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. आगामी चार महिन्यात मोठ्या प्रमाणावर सण आणि उत्सव असतात. त्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक असते. बाजारपेठा गजबजलेल्या असतात. सुरक्षेच्या अनुषंगाने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यापूर्वी कोंढवा भागात अनेक वेळा दहशवाद विरोधी कारवाया करण्यात आलेल्या असून अनेक दहशतवादयांना अटक देखील करण्यात आलेली आहे. तसेच, नुकतेच ईसिसचे मोड्यूल देखील उघडकीस आले होते. त्याअनुषंगाने एटीएसने केलेली कारवाई महत्वाची मानली जात आहे.