पुणे, दि. २४ –
बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला. ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे सुप्रिय सुळे यांनी सांगितले.
मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू
भर पावसात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे, आपणास सुरक्षितेसाठी मोठे काम करायचे आहे. गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. दौंडमध्ये काल मी गेले. त्या ठिकाणी घडलेली घटना पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे. आता लोक पुढे येत आहे. त्यामुळे त्या पालकांना धीर देण्याची गरज आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर येऊ देऊ नये. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू या. तसेच जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. बदलापूर आंदोलनात बाहेरची लोक होती, असे सत्ताधारी म्हणत होते, मात्र बाहेरचे लोक असले तरी घटनेचा निषेध महत्वाचा आहे.