आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांची रंगीत तालीम

0
75

चिंचवड, दि. 23 –
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मॉकड्रिल अर्थात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेतली. शुक्रवारी (दि. 23) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही रंगीत तालीम घेण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास या प्रसंगाला पोलिसांनी कसे सामोरे जायचे व परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यासंदर्भात मॉकड्रिल अर्थात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली.

कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी सतर्क रहावे यासाठी ही रंगीत तालीम घेतली जात आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव दोन दिवसांवर आला आहे. अनेक मंडळाकडून दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यासाठी मोठी गर्दी होते. या गर्दीमध्ये संभाव्य प्रत्येक परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत.

तसेच पुढील दोन आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. त्या अनुषंगाने माँकड्रिल घेवून ढाल सेक्शन, रायफल सेक्शन, गॅसगन सेक्शन यांचा सराव घेण्यात आला. पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना प्रत्येक परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याबाबत मार्गदर्शन केले.