ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवास हरिनाम गजरात प्रारंभगोकुळाष्टमी सप्ताहात भाविकांना आळंदीत धार्मिक पर्वणी

0
133

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंगळवारी ( दि.२० ) पासून हरिनाम गजरात प्रारंभ झाला. या निमित्त आळंदीत भाविकांना धार्मिक पर्वणी लाभणार आहे.
श्रीकृष्ण व माऊली जन्मोत्सवा निमित्त आळंदी मंदिरात २० ते २७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन-प्रवचन सेवा होत आहे. राज्यातील नामवंत कीर्तनकार-प्रवचनकार यांची सेवा तसेच गाथा भजन आदी सुश्राव्य सेवा आळंदीत मिळणार आहे. श्रींचे जन्मोत्सवात गाथा पूजन व आरती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांचे हस्ते झाली. यावेळी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, राजाभाऊ चौधरी, माऊली निंबाळकर आदी उपस्थित होते. मंदिरातील धार्मिक महत्त्व लक्षात घेत आळंदी देवस्थानने कार्यक्रम आणि माऊली मंदिरात विद्युत रोषणाईसह पुष्प सजावट देखील गोकुळाष्टमी दिनी करण्याची तयारी झाल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. सप्ताहाचे काळात मंदिरात दुपारी चार ते पाच दरम्यान प्रवचन सेवा होणार आहे. माऊली जन्मोत्सवातील प्रवचनकारांमध्ये चैतन्य महाराज कबीर यांची सप्ताह प्रारंभ दिनी प्रवचन सेवा आणि कीर्तनकारांमध्ये ह.भ.प.शंकर बडवे यांची हरिनाम गजरात कीर्तन सेवा रुजू झाली. या सप्ताहात आळंदीकर भाविक,नागरिकांनी श्रवण सुखाची पर्वणी लाभणार आहे.
श्रींचा जन्मोत्सव २६ ऑगस्ट रोजी पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना पवमान अभिषेक पूजा, दुधारती, ११ ब्रम्ह्व्रुन्दाचा वेदघोष अभिषेक होणार आहे. आळंदी देवस्थान तर्फे श्रीची गोकुळ पूजा होईल. त्यानंतर वंशपरंपरेने मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरिजागर सेवा होईल. श्रीचे जन्मोत्सव प्रसंगी पुष्पवृष्टी, आरती, सुंठवडा प्रसाद, उपवासाची खिरापत, मानकरी, सेवक यांना नारळ प्रसाद वाटप प्रथा परंपरेने वाटप होत आहे. २७ ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन सेवेने सांगता होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. आळंदी मंदिरातील परंपरांचे पालन करीत श्रींचे जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीची मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. माऊली मंदिरातून पंढरपूर येथील वारकरी तसेच महिन्याचे वारकरी आदींना निमंत्रण देण्यात आले आहे.
गोकुळाष्टमी सप्ताहासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप , विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, श्रीचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, संस्थानचे सेवक मानकरी, कर्मचारी वृंद भाविक,नागरिक यांचे माध्यमातून तयारीसह नियोजन केले जात आहे. या जन्मोत्सवातील विविध धार्मिक उपक्रमात भाविक, नागरिकांनी सहभागी वाहावे असे आवाहन आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांनी केले आहे.
कृष्ण जन्माष्टमी हा एक प्रसिद्ध हिंदू सण आहे. जो भगवान कृष्णाच्या पूजेला समर्पित आहे, त्यांचा जन्मोत्सव देशासह परदेशातही साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी दिनी श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव आळंदीत देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.