आम आदमी पार्टी खेड आळंदी विधानसभेच्या मैदानात ;

0
69

सर्वसामान्य जनतेतला आमदार करण्याचा निर्धार

राज्यात २८८ जागा लढविण्याची मोर्चे बांधणी सुरू :- मयूर दौंडकर

आळंदी, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी ) – आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने लढणार आहे. यासाठी राज्यातील २८८ मतदारसंघाबाबत दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू झाली आहेत. राज्यात पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. यात खेड-आळंदी मतदारसंघात गेल्या चार वर्षापासून आम्ही कंबर कसली असून तयारी सुरू केली आहे. आता ‘इंडिया आघाडी’सोबत निवडणूक लढायची की स्वबळावर लढायची, या संदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, परंतु आम्ही सध्या संपूर्ण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे, अशी जाहीर भूमिका आम आदमी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष ‘मयूर दौंडकर’ यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी पक्षाची भूमिका त्यांनी जाहीर केली.दौंडकर म्हणाले, सध्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न, तसेच औद्योगिक वसाहती मधील कामगारांची होणारी परवड, हे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. या साठी गेल्या चार वर्षापासून आम्ही मतदारसंघात तयारी सुरू केली आहे.

त्याचसोबत ‘वारी खेड-आळंदी’ची या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. यातच लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आहेत. त्याच मुद्यांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत. तालुक्याच्या विकासावर बोलणार आहोत. यात कुणावरही टीका-टिप्पणी करणार नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्याच्या राजकीय वातावरणावर बोलतांना ते म्हणाले की, राज्यांमध्ये सध्या महायुतीसाठी पोषक वातावरण दिसत नाही, गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपला रोष मतदानरूपाने व्यक्त केला आहे. कॉंग्रेस प्रणीत इंडिया आघाडीशी आमची आघाडी झाली किंवा झाली नाही तरी मतदारांचा कल आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडे असेल, असे सध्या चित्र आहे. सर्व ठिकाणी जो भ्रष्टाचार बोकाळला आहे, त्यावर तोडगा म्हणजे आम आदमी पार्टी आहे, हे जनतेच्या लक्षात आले असून दिल्ली पाठोपाठ पंजाब मध्येही जनतेने आमच्याकडे सत्ता सोपविली आहे, हा इतिहास अगदी ताजा आहे. महाराष्ट्रातील सूज्ञ जनताही याचेच अनुकरण करेल, असे आम्हाला वाटते.

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अलीकडेच तीन दिवसीय दिल्ली दौरा केला. यात त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, तसेच नेते खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांशीही चर्चा केली आहे. त्यामुळे राज्यात आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार की आघाडीत लढणार ? याचं उत्तर पुढील काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. असेही ते शेवटी म्हणाले.यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा महासचिव वैभव टेमकर तसेच आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष नितीन सैद, सुनील खिल्लारे, अनिल भोर, विठ्ठल परदेशी, सालीम ईनामदार, प्रकाश लामखेडे, इमरान खान आदी मान्यवर उपस्थित होते