नानासाहेब गायकवाड यांच्या गुन्ह्याशी संबंधित फाईल्स चोरीला

0
113

पुणे, दि. १९ ऑगस्ट (पीसीबी ) – कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसर्‍यांदा मोक्का अंतर्गत पुणे पोलिसांनी कारवाई केली. नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा गणेश गायकवाड व त्यांच्या कुटुंबाविरोधात सुनेने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या संबंधित महत्वाच्या फाइल्स चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला आहे.याबाबत सुयोग सुरेश देशमुख (वय ३२, रा. सयाजीराव गायकवाड ग्रुप, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार औंधमधील एनएसजी आय टी पार्कमधील सयाजीराव गायकवाड ग्रुपच्या कार्यालयात रविवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजून २० दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सयाजीराव गायकवाड ग्रुपच्या कार्यालयात हाऊसकिपिंगचे काम करतात. हे कार्यालय नानासाहेब गायकवाड यांच्या सुनेच्या ताब्यात आहे.

नानासाहेब गायकवाड याच्या सुनेने पती गणेश नानासाहेब गायकवाड व इतरांवर कौटुंबीय छळाची सर्वप्रथम तक्रार दिली होती.
त्यानंतर गायकवाड याचे कारनामे एका पाठोपाठ समोर आले. नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी गेल्या १० वर्षात खूनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जीवे मारण्याची धमकी देण, फसवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणे,
बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.पुणे पोलिसांनी या टोळीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. पुणे पोलिसांनी नानासाहेब गायकवाड याच्यावर तीन वेळा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला. एकाच कुटुंबातील तिघांवर तिहेरी मोक्का लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याने केलेल्या आर्थिक गुन्हेगारीवर लगाम लावण्याच्या दृष्टीने हा तिहेरी मोक्का लावण्यात आला आहे.

सयाजीराव गायकवाड ग्रुपच्या या कार्यालयात त्यांच्या सुनेने त्यांचे पती गणेश नानासाहेब गायकवाड व सासरचे इतर मंडळीविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांचे संबंधित महत्वाच्या फाईल्स ठेवल्या होत्या.रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे या काळात या महत्वाच्या फाईल्स व ९५ हजार रुपये रोखकोणीतरी चोरुन नेले. या चोरीतून गायकवाड कुटुंबाविरोधात असलेला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.