विशाल पाटलांची ठाकरे आणि महाविकास विरोधात भूमिका

0
45

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) सांगली : दिल्लीत उद्धव ठाकरेंना विधानसभेसाठी एकत्र राहण्याचा शब्द दिला, पण मतदारसंघात येऊन विशाल पाटलांनी ठाकरे आणि महाविकास विरोधात भूमिका जाहीर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खासदार विशाल पाटलांनी महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे विधानसभेतही, काँग्रेस-ठाकरेगटात जुंपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपक्ष आहे. कुणाला घाबरत नाही, कोणी बोलायचे काम नाही, अशा शब्दात विशाल पाटलांनी ठाकरे गटाला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.


लोकसभा निवडणुकीनंतर आता विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाशी पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आटपाडी येथे पार पडलेल्या जाहीर सभेतून स्पष्ट केले आहे. आपण अपक्ष असून कोणाला घाबरत नाही आणि आम्हाला कोणी बोलायचे कारण नाही, अशा भाषेत खासदार विशाल पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका खानापूर विटा मतदारसंघात राहणार असल्याचा स्पष्ट इशारा महाविकास आघाडी अर्थात ठाकरे गटाला अप्रत्यक्षपणे दिला आहे. खानापूर-विटा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे.

शिवसेनेकडून तशी मागणी देखील करण्यात आली आहे. काँग्रेसचे सहयोगी सदस्य असणारे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकत्र लढण्याचा शब्द दिला आणि दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांनी मतदारसंघात येऊन विरोधात भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि ठाकरे गट विशाल पाटलांच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.