रस्ते कामात ठेकेदार कंपन्या दोषी आढळल्याने ९२ कोटी रुपयांच्या निविदा अखेर रद्द

0
82

पिंपरी, दि. १६ ऑगस्ट (पीसीबी) – शहरातील रस्त्यांच्या ९० कोटींच्या नऊ कामांवर विविध आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्या कामातील त्रुटीची स्थापत्य विभागाकडून पडताळणी करण्यात आली. ठेकेदार कंपन्यांनी कागदपत्रे, टर्न ओव्हर, बँकेची कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र गोलमाल केले होते. त्यामुळे चार रस्ते कामात ठेकेदार कंपन्या दोषी आढळल्याने ९२ कोटी रुपयांच्या निविदा अखेर रद्द करण्यात आला आहे. या गैरव्यवहारात सामील असणारे अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार, सल्लागार यांच्या भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला आहे. करदात्या नागरिकांसमोर उघड झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी नागरिकातून होऊ लागली आहे.

महापालिकेने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नऊ रस्त्यांच्या कामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत रिंग झाल्याचा आरोप झाला होता. महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत अटी-शर्तींची पूर्तता करत नसताना काही ठेकेदार पात्र, तर पात्र असूनही काहींना अपात्र करण्यात आल्याचा आरोप झाला होता. काही ठेकेदारांनीच या प्रकरणात आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच, निविदेत खोट्या कागदपत्रांच्या व बोगस अनुभवाच्या आधारे ठेकेदारांना पात्र करण्यात आले. त्यामुळे सखोल चौकशी करून संगनमताने अनियमितता करणाऱ्या सल्लागार, ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

या निविदेत अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार, सल्लागार व निविदा प्रक्रिया राबवणारी समिती यांनी संगनमत करून रिंग करून अटी, शर्ती, ठेकेदार पात्र, अपात्र प्रक्रियेत आर्थिक लाभ घेऊन पूर्णपणे बेकायदेशीर काम केले आहे. त्यामुळे रस्ते रिंग प्रकरणाची चौकशी करून निविदा रद्द करण्यात आली. खोटी कागदपत्रे सादर करणारे ठेकेदार, त्यांची तपासणी करणारे सल्लागार व अधिकारी यांचे संगनमत असेल, तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी मारुती भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

ही कामे केली होती रद्द

चिंचवड विधानसभेतील विविध रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये बाबदेव मंदिर किवळे ते एक्स्प्रेस हायवेपर्यंतचा १८ मीटर डीपी रस्ता (१५कोटी,६५लाख,१२हजार,९९१रु), विकासनगर येथील मुख्य रस्ता व इतर डांबरीकरण (१५कोटी,६२लाख,९८हजार,४०४रु), मुकाई चौकापासून लोढा प्रकल्प ते एक्स्प्रेस हायवे लगतचा रस्ता(२३कोटी,५८लाख,६हजार,७४४रु), पवना नदीवरील मामुर्डी ते सांगवडे जोडणारा पूल बांधणे(३७कोटी,२५लाख,९१हजार,३३६रु) अशा चार कामाच्या एकूण र.रु.९२कोटी,१२लाख,२९हजार,५०५रु रकमेच्या निविदा रद्द केलेल्या आहेत.