कमला नेहरू रुग्णालयात संशयीत दहशतवादी घुसले, पोलिसांनी रुग्णालय केले रिकामे

0
114

पुणे दि. १४ ऑगस्ट (पीसीबी) – पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काही संशयीत दहशतवादी घुसल्याची बातमी समोर आली आहे. रुग्णालयातील काऊंटरवर बंदूकीचा धाक दाखवून अरेरावी केल्याचा दावा करण्यात आला त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या बातमीनंतर पोलीस प्रशासन खळबळून जागे झाले असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा रुग्णालयात तैनात करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णांना बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान, बातमीनंतर रुग्णांमध्ये भीतेचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन तासासाठी कमला नेहरू रुग्णालय बंद करण्यात आलं असून सर्व तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. यातील एक जण फरार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेले संशतीत बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले अतिरेकी नसल्याचेही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

उद्या 78वा स्वातंत्र्य दिन देशात साजरा होणार आहे, त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात एका रुग्णालयात संशयित दहशतवादी घुसल्याची माहिती समोर येणे हे पोलिसांच्या क्षमतेवरच प्रश्न उपस्थित करणारे मानले जात आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार दिवसापुर्वी पुण्यात एका पत्राद्वारे पुण्यातील हॉटेलवर अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर त्या हॉटेलवर सुरक्षा सुद्धा तैनात करण्यात आली आहे.