सांगवी, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 95 लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत सांगवी येथे घडला.याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वेल्थ फायनान्स अकॅडमीचे राजदीप शर्मा, दिशा संन्याल, www.zioptoao.com लिंक धारक आणि Rajdeep Stock Academy नावाचा व्हाट्सअप ग्रुप धारक व बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन केले. सुरुवातीला फिर्यादीस शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी टिप्स सांगितल्या. शेअर मार्केट मधून परतावा मिळवून देऊ असा फिर्यादीला विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून एप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. क्रिप्टो करन्सीचे ट्रेडिंग करण्यास सांगून त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे सांगून विश्वास दिला. त्यानंतर फिर्यादीकडून 95 लाख दहा हजार रुपये घेतले. या गुंतवणुकीवर फिर्यादी यांना अडीच कोटी रुपये फायदा झाल्याचे त्यांना एप्लीकेशन मध्ये दाखवण्यात आले. त्यानंतर फिर्यादींनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे एकूण रकमेच्या 16 टक्के रक्कम फी म्हणून मागितली. त्यावेळी आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.










































