महाळुंगे, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -गॅस कटरने एटीएम तोडून 15 लाख 81 हजार 400 रुपये रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 10) पहाटे साडेचार वाजता खेड तालुक्यातील सावरदरी येथे उघडकीस आली.प्रमोद सहदेव परब (वय 38, रा. लोहगाव, पुणे) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एचपी चौक ते वासुली फाटा रोड लगत सावरदरी गावात हिताची प्रॉपर्टी डेक्स सर्विसेस मार्फत एटीएम सेंटर सुरू करण्यात आले आहे. या एटीएम सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी पहाटे साडेचार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने एटीएम सेंटरच्या गाळ्याचे कुलूप गॅस कटरने तोडून आत प्रवेश केला.
गॅस कटरने एटीएम मशीनचा दरवाजा कट केला. मशीन मधून 15 लाख 81 हजार 400 रुपये रक्कम चोरून नेली. यामध्ये चार लाख रुपये किमतीच्या एटीएम मशीनचे नुकसान झाले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.












































