नाशिक, दि. ९ – महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली, ती पुढे चालू ठेवायची म्हणून चालू केली, बंद करायची म्हणून नाही. यासाठी तुम्ही आम्हाला सत्तेत पाठवलं पाहिजे, तरंच ही योजना सुरु राहील, त्यासाठी आमच्या नावापुढची बटणं दाबली पाहिजेत, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
नाशिकमधील निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील प्रमुख घटक पक्षांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. याचीच प्रचिती त्यांच्या आजच्या भाषणातून आली आहे. त्यांनी सरकारच्या योजनांचा परिपाठ मांडत महिला मतदारांना साद घातली आहे.
अजित पवार म्हणाले, महिला आणि तरुणवर्गासाठी आम्ही सरकारच्या योजना आणल्या, त्यात राष्ट्रवादीचं मोठं योगदान आहे. अर्थमंत्री म्हणून मी स्वत: या योजनांचा अभ्यास केला आहे. महिलांना मान सन्मान प्राप्त करुन देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणून ही योजना आम्ही आणली, खर्चाचा अभ्यास आम्ही केला, वायफळ खर्च कमी करुन काटकसर कशी करावी, हे सगळं पाहिलं. थेंबेथेंबे तळे साचे असतं त्याप्रकारे साडेतेरा कोटी जनतेचा संसार आम्ही करत आहोत. तुमच्या सबलीकरण व्हावं असं वाटतंय, तर आम्हाला मतदान केलं पाहिजे, अशी विनंतीही अजित पवारांनी केली आहे.
महायुतीचं सरकार भगिनींना भाऊबीज दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही, जुलै ऑगस्ट असे दोन महिन्याचे पैसै १७ तारखेला तुमच्या खात्यात जमा होतील, अशा शब्दांत अजित पवारांनी महिलांना आश्वासित केले आहे.
सत्ताधाऱ्यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर योजनांची घोषणा केली आहे, अशी टीका वारंवार विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही योजना आणायची म्हणून आणली नाही. ती बंद करायची म्हणून आणली नाही. ती चालू ठेवायची म्हणून आणली.’ तसेच सरकारवर आरोप केले जातात चुनावी जुमला म्हणून योजना आणल्या पण आम्हाला औटघटकेचं राजकारण करायचंच नाही, आम्हाला दीर्घकाळाचं राजकारण करायचंय.’ असा पलटवार देखील पवारांनी केला आहे.
विमल पाटील










































