विधानसभा निवडणूक, जागावाटप, मुख्यमंत्रि‍पदासाठीचा चेहऱ्यावर महाआघाडीची चर्चा

0
49

नवी दिल्ली, दि. ९ऑगस्ट (पीसीबी) – “महाविकासआघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. आमच्या तिन्हीही पक्षात अत्यंत प्रेमाचं आणि संवादाचे वातावरण आहे आणि आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरी जाणार आहोत”, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. नुकतंच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक, जागावाटप, मुख्यमंत्रि‍पदासाठीचा चेहरा यांसह विविध विषयांवर भाष्य केले.

“महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. लोकसभेचे निकाल महाराष्ट्रात चांगले लागलेले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दौरा होता. लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करावी, यासाठी त्यांचा हा दौरा होता. यादरम्यान त्यांनी इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरी जात आहोत. आमच्या तिन्ही पक्षात अत्यंत प्रेमाचं आणि संवादाचं वातावरण आहे. आमच्यात जागा वाटपाचे कोणतेही मतभेद नाहीत, सर्वकाही सुरळीत सुरु आहे. देशात महाविकासआघाडी ही एकमेव आघाडी आहे, ज्याचे तिन्ही पक्ष सांगतात की सर्व काही सुरळीत सुरु आहे. त्यामुळे अनेक बैठकीत राजकीय चर्चा कमी आणि बिगरराजकीय चर्चा जास्त झाल्या”, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील खोके सरकार घालवायचे
“मुंबईत येत्या १६ ऑगस्टला तिन्हीही पक्षांचा एकत्र मेळावा असणार आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधीदेखील महाराष्ट्रात येणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांचेही दौरे सुरु आहेत. आमच्यात उत्तम समन्वय आहे. निवडणुकीला सामोरी जाताना हातात हात घालून एकत्र गेलं पाहिजे. कोणतेही मतभिन्नता असता कामा नये. कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला ही भूमिका असता कामा नये. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सर्व निर्णय एकत्र बसून घ्यायचे, असे ठरवले आहे. फार ओढाताण करायची. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील हे खोके सरकार घालवायचे आहे”, असेही त्यांनी म्हटले.

“दिल्लीत झालेल्या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली. आमच्यात जागावाटपावरुन कोणताही तणाव नाही. आम्हाला असं वाटतंय की प्रत्येक जागेवर असा उमेदवार असावा ज्याची ताकद असेल आणि तो तिथे निवडून येईल. जो पक्ष जास्त जागा जिंकेल, त्याची जागा, असा आमचा फॉर्म्युला आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी असणार की नाही?
यानंतर त्यांना मुख्यमंत्रि‍पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची सातत्याने चर्चा सुरु आहे, त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी “उद्धव ठाकरेंचा चेहरा मुख्यमंत्रि‍पदासाठी असणार की नाही, याबद्दल तुम्हाला भविष्यात कळेल. ते सांगण्याची ही जागा नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय हा तिन्हीही पक्ष मिळून जाहीर करणार आहेत”, असे म्हटले.