बांगला देशातील हिंदू मोठ्या संकटात, घरे-दुकाने, मंदिरेही जाळली

0
153

दि.8 ऑगस्ट (पीसीबी) – बांगलादेशात खऱ्या अर्थाने आता हिंदू खतरे मे है, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पूर्वी तिथे ३२ टक्के असलेला हिंदी अवघा ८ टक्के असून तोसुध्दा आता महासंकटात सापडला आहे. गेल्या चार दिवसांत २७ जिल्ह्यांत हिंदू समुदायाला वेचून वेचून टार्गेट केले गेले. वायुवेग या पोर्टलवर कुठे किती हानी झाली त्याचे चित्रण आले आहे. इन्स्टाग्रामवर जाळपोळीचे चित्र अत्यंत भयंकर आहे. संशय आलेल्या नागरिकांना नग्न करून त्यांचा सुंता झालेला नसेल तर सरळ शिरच्छेद किंवा जींवत जाळण्याचा प्रकार झाल्याचे चित्र आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता पसरली आहे. बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, सर्वत्र जाळपोळ आणि तोडफोड केली जात आहे. समाजकंटकांकडून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याच्या बातम्या अनेक वृत्तवाहिन्यांनी दिल्या आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर हिंदू, त्यांची घरे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हिंसक हल्ले झाले आहेत, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. रविवारच्या हिंसाचारात दोन हिंदू नगरसेवकांचा मृत्यू झाला; तर समाजातील अनेक घरे आणि मंदिरांची तोडफोड करण्यात आली. तसेच सोमवारी ढाका येथील भारतीय सांस्कृतिक केंद्र आणि देशभरातील चार हिंदू मंदिरांवर हल्ला झाला. पण, बांगलादेशमध्ये नेमकं काय घडतंय? भारतासमोर आव्हाने कोणती? याविषयी जाणून घेऊ.

बांगलादेशमध्ये नक्की काय घडतंय?
‘डेली स्टार’च्या वृत्तानुसार, परशुराम ठाणा अवामी लीगचे हरधन रॉय आणि रंगपूर शहरातील प्रभाग ४ चे नगरसेवक यांची रविवारी हत्या करण्यात आली. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनी सोशल मीडियावर रॉय यांच्या लिंचिंगबद्दल लिहिले. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’नुसार, रविवारच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या १०० लोकांमध्ये रंगपूरच्या हिंदू काउन्सिलर काजल रॉय यांचाही समावेश होता. दरम्यान, बांगलादेशमधील प्रमुख इस्कॉन आणि काली मंदिरांसह हिंदूंची घरे आणि मंदिरांवरही मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले.

सोमवारी समाजकंटकांनी ढाक्यातील धानमंडी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची तोडफोड केली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मार्च २०१० मध्ये औपचारिकपणे या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. या केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक चर्चासत्रे, भारतातील गुरूंद्वारे योग शिक्षा, हिंदी, भारतीय शास्त्रीय गायन, संगीत आणि कथ्थक व मणिपुरी नृत्यकलांचे या केंद्रात आयोजन केले जायचे. त्यासह या केंद्रात भारतीय कला, संस्कृती, राजकारण, अर्थशास्त्र क्षेत्रातील २१ हजारांहून अधिक पुस्तके असलेले ग्रंथालय आहे.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, बांगलादेशातील मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिरालाही सोमवारी आग लावण्यात आली. “मेहेरपूरमधील आमचे एक इस्कॉन केंद्र जाळण्यात आले. मंदिरात भगवान जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा देवी या देवतांच्या मूर्ती होत्या. मंदिरातील तीन भाविक कसेतरी पळून जाण्यात आणि स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले”, असे इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंदा दास यांनी ‘एक्स’वर लिहिले. याच परिसरातील एका काली मंदिरालाही आग लागली. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन युनिटी कौन्सिलच्या नेत्या काजोल देबनाथ यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले की, मंदिरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. परंतु, बांगलादेशच्या लोकसंख्येच्या सुमारे आठ टक्के म्हणजेच सुमारे १३ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या हिंदूंमध्ये त्यामुळे भीती निर्माण झाली आहे.

“माझ्या फोनमध्ये बांगलादेशात हिंदूंवर हल्ले आणि मारले गेल्याच्या तपशिलांचे अनेक एसओएस, व्हिडीओ आले आहेत. मंदिरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. मुख्य म्हणजे ढाक्यामध्ये अवामी लीगला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांनाही आता जीवाचा धोका आहे. लोकांच्या गाड्या तपासल्या जात आहेत. मी एका पत्रकाराला ओळखते; ज्याने मला फोन करून नवी दिल्लीला सोडण्याची विनंती केली. तो मुस्लीम आहे. मग आता बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीची कल्पना करा. लोकांवरील हल्ले वाढत आहेत. त्यापैकी बहुतेक नोंदवलेही जाणार नाहीत,” असे बीइंग हिंदू इन बांगलादेश या पुस्तकाचे लेखक दीप हलदर यांनी ‘न्यूज १८’ला सांगितले.

ओक्य परिषदेचे वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस मोनिंद्र कुमार नाथ यांनी ‘डेली स्टार’ला सांगितले की, समुदायामध्ये भीती पसरली आहे. “ते (हिंदू) रडत आहेत, त्यांना मारहाण होत आहे, त्यांची घरे आणि व्यवसाय लुटले जात आहेत. आमचा काय दोष? आम्ही देशाचे नागरिक आहोत हा आमचा दोष आहे का?,” असे नाथ म्हणाले. ते पुढे म्हणाले, “इथे असे हल्ले होत राहिले, तर आम्ही कुठे जाणार? आम्ही हिंदू समाजातील सदस्यांचे सांत्वन कसे करू शकतो?”

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी सत्तेवर येण्याच्या शक्यतेमुळे भारतात संभाव्य निर्वासित संकटाची भीती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरामसह ४,०९६ किलोमीटरची सीमा आहे. ‘डेक्कन हेराल्ड’च्या मते, म्यानमारमध्ये आंग सान स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथून टाकल्यानंतर मिझोराम, मणिपूर व नागालँडला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासदार आणि मंत्र्यांसह म्यानमारमधील ३५ हजारहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये आहेत. मणिपूरमधील मैतेई-कुकी संघर्षामागे हेदेखील एक कारण असल्याचे मानले जात होते.

आसाममध्ये असम राष्ट्रीय परिषदेने (एजेपी) एका निवेदनात केंद्राने सीमा सुरक्षित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. “बेकायदा स्थलांतरितांचा अधिक भार आसाम उचलू शकत नाही म्हणून त्यांचा हा ओघ रोखण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. १९८५ च्या आसाम करारात मान्य केल्याप्रमाणे सीमेवर कुंपण घालण्यात, परदेशी लोकांची ओळख पटवण्यात आणि त्यांना बाहेर काढण्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरले आहे. १९७१ नंतरच्या सर्व स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) अद्याप लागू करण्यात आलेली नाही. नरेंद्र मोदी सरकारने २०१४ पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लीम स्थलांतरितांचे स्वागत करण्यासाठी सीएए लागू केल्यानंतर घुसखोरीची भीती आणखी वाढली आहे”, असे एजेपीचे सरचिटणीस लुरिनज्योती गोगोई यांनी लिहिले आहे.

हिंदू निर्वासितांच्या आश्रयाचे संकट?
‘द प्रिंट’ने पश्चिम बंगाल सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सीमेवर बोनगाव आणि कूचबिहारमध्ये भारतीय सैन्य तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महासंचालकांनीही कोलकात्याला जाण्याच्या त्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. बीएसएफच्या सूत्रांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, सीमेवरील परिस्थिती सामान्य आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारलाही इशारा दिला. “तीन दिवसांत ही परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्याची मानसिक तयारी ठेवा. केंद्राने याची माहिती बंगालचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना द्यावी. सीएए आहे. तेथे परिस्थिती नियंत्रणात न आल्यास जमात आणि कट्टरपंथी अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात घेऊ शकतात” , असे अधिकारी म्हणाले.

जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले, “बांगलादेशातील परिस्थिती अजून बिघडत आहे. लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान जबाबदारी स्वीकारण्याबद्दल आणि अंतरिम सरकार स्थापन करण्याबद्दल बोलले आहेत,” असे जयशंकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अल्पसंख्याक, त्यांचे व्यवसाय आणि मंदिरांवरही अनेक ठिकाणी हल्ले झाले. ही बाब चिंताजनक आहे. याची संपूर्ण व्याप्ती अद्याप स्पष्ट झालेली नाही.”

भारताने रविवारी रात्री बांगलादेशमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला. नवीन ॲडव्हायजरीमध्ये भारताने आपल्या नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशला न जाण्यास सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) यात म्हटले आहे, “चालू घडामोडी लक्षात घेता, भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशमध्ये प्रवास करू नये. “सध्या बांगलादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे त्यात म्हटले आहे. बांगलादेशात गेल्या महिन्यात आरक्षणाच्या विरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू झाली. या आंदोलनाचे आता सरकारविरोधी आंदोलनात रूपांतर झाले आहे. २५ जुलै रोजी एमईएने सांगितले की, त्या देशातील परिस्थिती पाहता, सुमारे ६,७०० भारतीय विद्यार्थी बांगलादेशातून परतले आहेत.