गोदापूजन करताना महावितरणचा अभियंता पुरात गेला वाहून; तीन वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली

0
82

दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) नाशिक : गोदापात्रात पूजन करताना पाय घसरुन पडल्याने महावितरणचा अभियंता पुरात वाहून गेला. तर वाहून जाणाऱ्या तीन वर्षीय मुलीला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. डोळ्यादेखत मुलगा वाहून गेल्याने युवकाच्या आईने रामकुंड परिसरात एकच टाहो फोडला होता. दरम्यान, सुरगाणा तालुक्यातही नदीच्या पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सकाळी काठालगत आढळला. इगतपुरी तालुक्यातील भाम धरणातून सोडलेले पाणी काळुस्ते गावातील घरांमध्ये शिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाच ते सहा कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागले. 

सुरगाणा, देवळा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत घरांची पडझड झाली. काही ठिकाणी पशूधनाचे नुकसान झाले.रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. गंगापूरमधील विसगार्मुळे गोदावरीची पातळी उंचावली आहे. ओझर येथील यग्नेश पवार (२९) हे कुटुंबियांसमवेत पूजाविधीसाठी रामकुंड परिसरात आले होते. नदीत पूजन करत असताना पाय घसरून ते वाहून गेले. जीवरक्षकांकडून बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. पवार हे महावितरण कंपनीत भुसावळ येथे अभियंता पदावर कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशीच एक घटना सुरगाणा तालुक्यात घडली. चिंचदा येथील मंगला बागूल या रात्री नदी पार करत असताना अचानक पाण्याचा लोंढा वाढल्याने त्या वाहून गेल्या. त्यांचा मृतदेह सकाळी नदीकाठावर आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.