भोसरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) -उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून तरुणीला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 जुलै रोजी आदर्शनगर, मोशी येथे घडली.पायल मच्छिंद्र कोकाटे (वय 18 वर्ष 9 महिने) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राम कोकणे (रा. अजनावळे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पायल यांची आई नंदा मच्छिंद्र कोकाटे (वय 48, रा. मु. पो. बोतार्डे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम कोकणे याला फिर्यादी यांची मयत मुलगी पायल हिने उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागितले असता आरोपी कोकणे याने पैसे देण्यास नकार दिला. तसेच तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने सध्या राहात असलेल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.










































