बावधन व लवळे येथे नवीन अतिउच्चदाब उपकेंद्राला महावितरणची मंजूरी; १.६० लाख वीजग्राहकांना लाभ

0
75
xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

बावधन, कोथरूड, वारजे, भूकूम, भूगाव, लवळे परिसरात होणार दर्जेदार वीजपुरवठा

पुणे, दि. २ ऑगस्ट (पीसीबी) – विजेची वाढती मागणी व सद्यस्थितीत असलेल्या वीजयंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी लवळे (ता. मुळशी) येथील प्रस्तावित नॉलेज सिटी १३२/२२ केव्ही व पुण्यातील बावधनमध्ये २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजूरी देण्यात आली आहे. या दोन्ही उपकेंद्रामुळे बावधन, कोथरूड, वारजे, भूकूम, भूगाव, पिरंगुट, लवळे व नांदे या परिसराला आणखी दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे.

पुणे परिमंडलातील वाढती विजेची मागणी व भविष्यातील वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी प्रस्तावित २१ अतिउच्चदाब उपकेंद्रांचा आराखडा मुख्यालयास सादर केला आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी पुणे परिमंडल अंतर्गत चऱ्होली येथे २२०/३३/२२ केव्ही प्राईड वर्ल्ड सिटी, मोशी येथे २२०/२२ केव्ही सफारी पार्क, ताथवडे येथे २२०/२२ केव्ही यशदा उपकेंद्र, बावधन येथील बावधन २२०/२२ केव्ही आणि लवळे येथील नॉलेज सिटी १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्यास मंजूरी दिली आहे. तसेच भोसरी येथील २२०/२२ केव्ही सेन्चुरी एन्का उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजूरी दिली आहे. हे सर्व मंजूर प्रस्ताव महावितरणकडून महापारेषणकडे पाठविण्यात आले आहेत. अतिउच्चदाबाचे नवीन उपकेंद्र उभारणे व क्षमतावाढीचे कामे महापारेषणकडून करण्यात येणार आहे.

महावितरणच्या शिवाजीनगर विभाग अंतर्गत बावधन येथील २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामुळे महापारेषणच्या एनसीएल १३२/२२/११, नांदेड सिटी २२०/२२ केव्ही आणि १३२/२२/११ केव्ही उपकेंद्रातील वीजभार कमी होणार आहे. बावधन येथील नव्या उपकेंद्रातील १० वीजवाहिन्यांद्वारे बावधन, चांदणी चौक, कोथरूड, वारजे परिसरातील ९५ हजार वीजग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होईल. तसेच मुळशी विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या नॉलेज सिटी १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील २२ केव्हीच्या १५ वीजवाहिन्यांद्वारे भूकूम, भूगाव, पिरंगुट, लवळे, नांदे, नॉलेज सिटी आदी परिसराला वीजपुरवठा करण्यात येईल. त्याचा थेट फायदा सुमारे ६५ हजार ग्राहकांना होईल. सोबतच पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील १८ पैकी ४ वीजवाहिन्यांचा भार हा नॉलेज सिटी उपकेंद्राकडे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे पिरंगुट उपकेंद्रातील सध्याचा वीजभार कमी होईल. पर्यायाने या उपकेंद्रातील उर्वरित वीजवाहिन्यांवरील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना देखील आणखी सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होईल.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- ‘पुणे परिमंडलामध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीजपुरवठ्यासाठी वितरण व पारेषणच्या वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व क्षमतावाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. बावधन व लवळे येथील महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रामुळे महावितरणच्या सर्व वर्गवारीतील सुमारे १ लाख ६० हजार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होईल’.