बांगलादेशी घुसखोराची भारतातून पोलंडला जाण्याची तयारी; सांगवी पोलिसांकडून चार घुसखोरांना अटक

0
136

सांगवी, दि. 2 ऑगस्ट (पीसीबी) -भारतात घुसखोरीच्या मार्गाने येऊन अनेक वर्ष वास्तव्य केल्यानंतर पासपोर्ट काढून पोलंड देशात जाण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीसह चार बांगलादेशी नागरिकांना सांगवी पोलिसांनी अटक केली. पोलीस पडताळणीसाठी आलेल्या अर्जाबाबत संशय आल्याने सांगवी पोलिसांनी चौकशी करत ही कारवाई केली.सागोर सुशांतो बिस्वास (वय 26), देब्रोतो बोबेन बिस्वास (वय 26), जॉनी बोबेन बिस्वास (वय 27, तिघे रा. दोरीशोलोई, पो. आरपारा, शालीखा, जि. मागुरा, खुलना, बांगलादेश), रोनी अनुप सिकदर (वय 28, रा. बाहीर नोगोर, पो. भीमपुर, जि. फरीदपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, सागोर बिस्वास हा मागील अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करीत आहे. त्याने बारावी पर्यंत शिक्षण घेतले असून तो काही वर्षांपासून हॉटेल मध्ये वेटरचे काम करत आहे. पोलंड येथे वेटरचा जॉब करण्यासाठी त्याने भारतातून पोलंडला जाण्याचे ठरवले.त्यासाठीत याने पासपोर्ट काढला. त्यानंतर विदेश विमान प्रवासासाठी लागणारे पोलीस क्लियरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) काढण्यासाठी त्याने अर्ज केला. हा अर्ज सांगवी पोलिसांकडे आला. सांगवी पोलीस ठाण्यात चारित्र्य पडताळणीचे काम पाहणारे पोलीस अंमलदार जितेंद्र बाविस्कर यांना सागोर बिस्वास याच्या अर्जाबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी बिस्वास याने अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर भेट दिली. त्यावेळी तो त्या पत्त्यावर राहत नसल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे सांगवी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सागोर बिस्वास हा बांगलादेशी घुसखोर असून त्याच्याकडे वैध व्हिसा व भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी नसल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे जन्माचा दाखला आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट देखील बनावट असल्याचे उघडकीस आले.सांगवी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेच्या मदतीने सागोर बिस्वास याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत त्याच्या एका साथीदाराला पुनावळे येथून तर दोघांना पुणे कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडे बनावट जन्मदाखला, आधारकार्ड, पॅन कार्ड आढळून आले. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी पासपोर्ट काढले असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे, पोलीस अंमलदार तुषार साळुंखे, विजय मोरे, जितेंद्र बावस्कर यांच्यासह दहशतवाद विरोधी शाखेने केली आहे.