रीलवरील भाईचा कारनामा; घरफोडीच्या पैशांतून मध्य प्रदेशातून खरेदी केल्या पिस्तुल

0
64
crime

30 जुलै (पीसीबी) चिंचवड,
दुचाकीवरून जाताना पिस्तुल हवेत फिरवून दहशत पसरविणाऱ्या पाच जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील एका आरोपीने गुन्हा दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी घरफोड्या केल्या. त्यातून मिळालेल्या पैशांमधून त्याने मध्य प्रदेशात जाऊन पिस्तुल खरेदी केले. याबाबत गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींकडून 10 लाख 75 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने, आठ दुचाकी, चार पिस्तुल, चार जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी चिखली परिसरात दुचाकीवरून जाताना पिस्तुल हवेत फिरवत रील्स बनवून ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले. त्यानंतर दरोडा विरोधी पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांचे इतर साथीदार फरार होते. दरम्यान, त्याच गुन्ह्यातील आरोपी सुशील उर्फ बारक्या भरत गोरे (वय 18, रा. ओटास्कीम, निगडी) याने पिस्तुलाचा धाक दाखवून कपड्याच्या दुकानातून जबरदस्तीने कपडे चोरून नेले. काही ठिकाणी घरफोड्या केल्या.

आरोपी सुशील हा त्याचा साथीदार अक्षय प्रभाकर कणसे (वय 22) याच्यासोबत खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका खोलीत राहू लागला. याबाबत दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली. दरोडा विरोधी पथकाने सापळा लाऊन सुशील गोरे आणि अक्षय कणसे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देखील दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

आरोपी सुशील याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जबरी चोरी, घरफोडी, मारामारी असे अनेक गुन्हे केल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी सुशील आणि त्याच्या साथीदारांकडून दोन लाख दोन हजार रुपये किमतीचे चार पिस्तुल, चार जिवंत काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या, 10 लाख 75 हजार रुपये किमतीचे 18 तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, चार लाख 85 हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी असा एकूण 17 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईमुळे खडकवासला, पर्वती, हडपसर, भारती विद्यापीठ, कोंढवा, सिंहगड, विश्रामबाग, चिखली, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. सुहील गोरे याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, वाहन चोरी, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची तोडफोड असे एकूण 28 गुन्हे दाखल आहेत. तो सहकारनगर आणि चिखली पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यात फरार होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार विक्रांत गायकवाड, गणेश हिंगे, महेश खांडे, गणेश सावंत, आशिष बनकर, विनोद वीर, उमेश पुलगम, गणेश कोकणे, राहुल खारगे, नितीन लोखंडे, प्रवीण कांबळे, प्रवीण माने, अमर कदम, समीर रासकर, चिंतामण सुपे, औदुंबर रौंगे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.

मध्य प्रदेशातून आणल्या पिस्तुल

आरोपी सुशील याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने चिखली परिसरात घरफोड्या केल्या. घरफोड्या मधून मिळालेल्या पैशांमधून त्याने मध्य प्रदेश येथे जाऊन पिस्तुल विकत आणल्या. त्या पिस्तुल व्यवस्थित चालतात की नाही, हे पाहण्यासाठी त्याने त्याच्या घरातच चार गोळ्या झाडल्या. त्याच्या चार रिकाम्या पुंगळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.