खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय शहरी मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे मागणी
पिंपरी, दि. ३० – भक्ती-शक्ती चौक ते किवळे, मुकाई चौक-वाकड ते पिंपळेसौदागरपासून चाकण या मार्गावर मेट्रो सुरु करावी. त्याबाबतचा सविस्तर आराखडा बनविण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
याबाबत केंद्रीय शहरी कार्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. हा भाग झपाट्याने विकसित होत असल्याने या मार्गावर मेट्रोची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याला खट्टर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही शहरे सर्वाधिक वेगाने नागरिकरण होणारी आहेत. औद्योगिक, कामगारनगरी, एमआयडीसी असल्याने शहराची लोकसंख्या 30 लाखाच्या घरात गेली आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढत आहे. परिणामी, वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोच्या कामाला नुकतीच मान्यता दिली. त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. चिंचवड, आकुर्डी, निगडीपर्यंतच्या काम गतीने सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढणारी लोकसंख्या पाहता भक्ती-शक्ती चौक ते किवळे, मुकाई चौक-वाकड ते पिंपळेसौदागरपासून चाकणपर्यंत मेट्रो होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तत्काळ याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.