प्रदुषणाला जबाबदार महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीवर बंदी आणा, डॉ.अमोल कोल्हे यांची संसदेत मागणी

0
86

पुणे, 30 जुलै (पीसीबी) – रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीच्या जल आणि शेतजमिनींच्या प्रदुषणाचा विषय आज लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करुन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कंपनीच्या कामकाजावर बंदी आणण्याची मागणी केली.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनी (एमईपीएल) कडून होणारे प्रदुषण थांबण्याची मागणी अण्णापूर, निमगाव भोगी, ढोकसांगवी, कर्डेलवाडी, सरदवाडी आदी गावातील शेतकरी करीत आहेत. मात्र एमईपीएल कंपनी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची दखल गंभीर घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत हा विषय उपस्थित केला. खासगी प्रयोगशाळेत चाचणी केली असता एमईपीएलकडून सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्यात निकेल, कॅडमियम आणि शिसे (लीड) असे घातक धातू आढळून आले आहेत, असे असतानाही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कंपनीला क्लीन चीट दिली जाते, या वास्तवाकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी सदनाचे लक्ष वेधले.

वास्तविक रांजणगाव औद्योगिक वसाहत नॉन केमिकल झोन आहे. अशा परिस्थितीत एमईपीएलकडून सोडल्या जाणाऱ्या केमिकलमिश्रीत पाण्यामुळे होणारे प्रदुषण गंभीर असून अण्णापूर, निमगाव भोगी, ढोकसांगवी, कर्डेलवाडी, सरदवाडी आदी गावातील विहीरी व तलावांचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्याचबरोबर शेतजमिनी नापीक होत असल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे यांनी प्रदुषणामुळे ज्या गावांचे नुकसान झाले आहे, त्या गावातील जलस्रोत व मृदा सुधारणेसाठी तातडीने पावलं उचवावीत अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.