वडापावची खंडणी मागणाऱ्या तीन भुरट्या भाईंना अटक

0
127

पिंपरी, दि. 26 जुलै (पीसीबी) – मी इथला भाई आहे. मला वडापाव द्यायचा. त्याचे पैसे मागायचे नाहीत. तसेच मला महिन्याला एक हजार रुपये हप्ता द्यायचा असे म्हणत खंडणीची मागणी करणाऱ्या तीन भुरट्या भाईंना पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री दहा वाजता गाय वासरू चौक, मोहननगर, चिंचवड येथे घडली.संजय उर्फ बाबाभाई बिरप्पा वाघमोडे (वय 31), कौस्तुभ संजय कानकात्रे (वय 24), प्रमोद संतोष बंडगर (वय 21, तिघे रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सतीश मोहन चौधरी (वय 30, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे मोहननगर येथील गायवासरू चौकात चौधरी स्नॅक्स सेंटर व लंचहोम नावाचे हॉटेल आहे. बुधवारी रात्री दहा वाजता आरोपी तिघे चौधरी यांच्या हॉटेल समोर आले. आरोपींनी ‘आम्हाला वडापाव द्यायचा. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत. मी इथला भाई आहे. मला एक हजार रुपये हप्ता द्यायचा’ असे म्हणत चौधरी यांना शिवीगाळ करून हाताने व खुर्चीने मारहाण केली. तू जर मला एक हजार रुपये हप्ता दिला नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. चौधरी यांना जिवे मारण्याची धमकी देत आरोपी हॉटेल मधून वडापाव घेऊन गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.