अतिवष्टीमुळे सर्व शाळा आज बंद

0
161

पिंपरी, २४ जुलै (पीसीबी) – हवामान विभागाने येत्या काही तासात पिंपरी चिंचवड शहर परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला असल्याने शहरातील शाळा आज २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले असून अतिरिक्त आयुक्तांवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय समन्वय ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे क, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय, विजयकुमार खोराटे यांच्याकडे ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय तर चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. हा संदेश महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना तात्काळ कळविण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनदेखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.