आता लाडकी बायको योजना आणा – जयंत पाटील

0
133

दि. २३ जुलै (पीसीबी) नाशिक : आज महाराष्ट्र सरकार हे भेदरलेल्या अवस्थेत आहे. काय करू, कसं करू आणि मतं मिळवू,अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. लाडकी बहीण , भाऊ अशा योजना त्यांनी आणल्या आहेत. आता लाडकी बायको, अशी योजना आणा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे. नाशिक येथे आयोजित शरद पवार गटाच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यातून ते बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यातील सर्व जागा निवडून आण्यासाठी प्रयत्न करु. नाशिकने ठरवले तर महाराष्ट्र त्याचे अनुकरण करते. महाराष्ट्र हा भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.सर्व्हे केला तेव्हा राज्यात आघाडीच्या ३५ जागा येतील, असा अंदाज आला पण ३१ जागा आल्या. काही ठिकाणी पैशाचा पाऊस पडला. त्यामुळे काही जागा गेल्या, असे त्यांनी म्हटले.
देशात भाजपच्या विरोधात सर्व सामान्य माणसाच्या भूमिका नकारात्मक आहे. आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काहीही आले नाही. तोंडाला पाने पुसली गेली. ठोस योजना नाही याची खंत आहे. आज महाराष्ट्र सरकार हे भेदरलेल्या अवस्थेत आहे. काय करू, कसं करू आणि मतं मिळवू,अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. आता लाडकी बहीण, भाऊ, अशा योजना आणल्या. आता लाडकी बायको अशी योजना आणा, असा टोला त्यांनी यावेळी सरकारच्या योजनांवर लगावला.

महायुती सरकारकडून राज्याची अधोगती करण्याचे काम
आमचे सरकार आले तरच योजना मिळेल, असे म्हणतात. पण त्यांना सांगतो आम्ही आहे ना खंबीर. हिसका दाखवला म्हणून हे वटणीवर आले. म्हणून या योजना आणताय. शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणताय, पण आमच्यातले सर्व तुम्ही घेतले आहेत. राज्यातील अनेक उद्योग तुम्ही गुजरातला नेलेत. राज्याची अधोगती करण्याचे काम तुम्ही केले, अशी टीका त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केली.