लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी जीवन सोमवंशी

0
107

पिंपरी, दि. : २३ – लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी जीवन सोमवंशी यांची निवड करण्यात आली. ऑटोक्लस्टर सभागृह, चिंचवड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त रविवार, दिनांक २१ जुलै २०२४ रोजी वेदान्ताचार्य ह. भ. प. सुभाषमहाराज गेठे, निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन संदीप माहेश्वरी, मालपाणी उद्योगसमूहाचे डायरेक्टर आणि लायन्सच्या महाराष्ट्र विभागाचे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन गिरीश मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जुलै २०२४ ते जून २०२५ या १९व्या सेवावर्षासाठी नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. त्यामध्ये जीवन सोमवंशी (अध्यक्ष), मुरलीधर साठे (सचिव), मुकुंद आवटे (कोषाध्यक्ष) यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी गिरीश मालपाणी यांनी आपल्या मनोगतातून रामायण आणि महाभारतातील दाखले देत उत्तम नेतृत्वासाठी आवश्यक असलेल्या दहा गुणांची माहिती दिली. सुभाषमहाराज गेठे यांनी उत्तम कर्म करून अर्जित केलेले धन योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी लायन्स क्लब हे उत्तम माध्यम आहे, असे विचार मांडले; तर संदीप माहेश्वरी यांनी लायन्स क्लबच्या सर्वांगीण सेवाकार्याविषयी गौरवोद्गार काढून संस्थेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. माजी अध्यक्ष डॉ. शंकर गायकवाड यांनी आपल्या सेवावर्षातील ९३ सेवा उपक्रमांविषयी चित्रफितीच्या माध्यमातून वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणविषयक उपक्रमांवर सुमारे वीस लाखांहून अधिक निधी खर्च केल्याचा अहवाल सादर केला. नूतन अध्यक्ष जीवन सोमवंशी यांनी आपल्या सेवावर्षात तन, मन, धन समर्पित करून क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहयोगातून सेवेचा नवा मानदंड निर्माण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन अध्यक्ष यांच्या सेवावर्षाची सुरवात खालील सेवाकार्याने पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा नरकेवाडी, शिरूर येथे विद्यार्थाना बसण्यासाठी संदीप वाळुंज यांच्या देणगीतून ₹ २५०००/-चे बेंच भेट दिले. ऊसतोड कामगाराच्या मुलाला लॉ कॉलेज शिक्षणाचा एक वर्षाचा संपूर्ण खर्च डॉ. रोहिदास आणि डॉ. माधुरी आल्हाट यांच्या देणगीतून ₹ ६००००/- देऊन केला. त्याचप्रमाणे ⁠घरकामगार असलेल्या महिलेच्या दहावीला ९६% गुण मिळवलेल्या मुलीला पुढील दोन वर्षे संपूर्ण शिक्षणासाठी लागणारी सर्व रक्कम जीवन सोमवंशी यांनी देण्याचे वचन देऊन सुरवातीचे ₹ ३००००/- अदा केले; तसेच आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थांना वैद्यकीय उपचार करण्यासाठी प्रतिवर्षी क्लब सदस्यांच्या वर्गणीतून रोख ₹ १५०००/- ची मदत केली.

शीतल सोमवंशी, जयश्री साठे, सायली संत, तृप्ती शर्मा, डॉ. दीपाली कुलकर्णी, डॉ. माधुरी आल्हाट, किरण आवटे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले आणि मुकुंद आवटे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप वाळुंज यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.