तळेगाव, दि. २३ जुलै (पीसीबी) – गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह मावळ तालुक्यातील इंदोरी येथे आणण्यात आला. दरम्यान तिची दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागल्याने आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राने दोन्ही मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिले. तसेच महिलेचा मृतदेह देखील इंद्रायणी नदीत फेकला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. वराळे, ता. मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गर्भपात करण्यासाठी मदत करणारी महिला एजंट बुधवंत (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), अमर हॉस्पिटल कळंबोली मधील संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.समरीन निसार नेवरेकर (वय 25), ईशांत निसार नेवरेकर (वय 5), इजान निसार नेवरेकर (वय 2, रा. वराळे, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात समरीन नेवरेकर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची चौकशी करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. समरीन हिला तिचा प्रियकर गजेंद्र याने गर्भपात करण्यासाठी ठाणे येथे त्याच्या मित्रासोबत पाठविले होते. त्या ठिकाणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत तिथल्या डॉक्टरांनी नजीकच्या पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र डॉक्टरांनी तसे केले नाही. या उलट डॉक्टरांनी समरीन हिचा मृतदेह आरोपी रविकांत गायकवाड आणि एजंट महिला बुधवंत यांच्या ताब्यात दिला. आरोपींनी समरीन हिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह इंदोरी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावर आणला. तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. दरम्यान दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. आरोपींनी आपले बिंग फुटेल म्हणून दोन्ही मुलांना जिवंतपणे नदीमध्ये फेकून दिले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिथून हा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी गजेंद्र आणि रविकांत या दोघांना अटक केली. दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम मस्के तपास करीत आहेत.