नरेंद्र मोदी हेच खरे भ्रष्टाचाराचे सरदार

0
53

मुंबई, दि २२ जुलै (पीसीबी) – पुण्यात रविवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र डागले. शरद पवार हे भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत, असे त्यांनी म्हटले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार , नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा, असे आव्हान दिले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शाह-फडणवीसांवर निशाणा साधला आहे.नाना पटोले म्हणाले की, काल पुण्यात घोषणांचा पाऊस आणि धमकीवजा कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ⁠फडणवीस साहेबांच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले आरक्षण ते टिकवू शकले नाहीत. ⁠असंविधानिक सरकार यांनी बोलावलं आहे. सुप्रीम कोर्टाने हे अंसविधानिक सरकार ठरवलं आहे. 105 आमदार निवडून दिल्यानंतर लोकांना आता चुकी केल्यासारखे वाटत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांच्या संदर्भात अमित शाह बोलले, हे कळत नाही. आपणच त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला होता. ⁠नरेंद्र मोदी हेच खरे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, असे म्हणत त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तर ⁠एकनाथ शिंदे हे 20 जून रोजी म्हणाले होते की, विशाळगडाचा मला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. ⁠त्यामुळे विशाळगडावर घडलेली घटना ही सरकार पुरस्कृत दंगल होती का? असा सवालई त्यांनी यावेळी उपस्थित केला.

त्यावेळी उज्वल निकम यांचा असली चेहरा कोण होता?

अमित शाह यांनी मेळाव्यात उद्धव ठाकरेंवरही टीका केली. स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत, असे त्यांनी म्हटले. यावर नाना पटोले म्हणाले की, भाजपने तिकीट दिलेल्या उज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा मुद्दा आणला होता. कोणाच्या इशारावरून त्यांनी हा मुद्दा काढला होता हे त्यांना विचारलं पाहिजे. त्यावेळी उज्वल निकम यांचा असली चेहरा कोण होता? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.