लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या अध्यक्षपदी नंदिता देशपांडे

0
82

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ रिजन ३ झोन ४) च्या अध्यक्षपदी नंदिता देशपांडे यांची निवड करण्यात आली. साई मंगल बॅंक्वेट, संभाजीनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २० जुलै २०२४ रोजी प्रांतपाल एम जे एफ लायन प्रसाद पानवलकर यांनी जुलै २०२४ ते जून २०२५ या कालावधीसाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीला सेवाकार्याची शपथ दिली. नूतन कार्यकारिणीमध्ये नंदिता देशपांडे (अध्यक्ष), प्रसाद दिवाण (उपाध्यक्ष), अनुजा करवडे (सचिव), विनायक केळकर (खजिनदार), दीपश्री प्रभू (जनसंपर्क अधिकारी) आणि प्रदीप कुलकर्णी, विनय देशपांडे, नरेंद्र प्रभू, मकरंद शाळिग्राम, उज्ज्वला कुलकर्णी, चेतन भालेराव यांचा संचालक म्हणून समावेश करण्यात आला आहे. उपप्रांतपाल राजेश आगरवाल, प्रा. शैलजा सांगळे आणि शशांक फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. त्यापूर्वी माजी अध्यक्ष रजनी देशपांडे यांनी जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची चित्रफितीच्या माध्यमातून माहिती दिली.

नूतन अध्यक्ष नंदिता देशपांडे यांनी पौराणिक कहाणी कथनाच्या शैलीतून मनोगत व्यक्त करताना, “‘व्रत सेवेचे… तप निष्ठेचे’ हे ब्रीद घेऊन लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सने तपपूर्ती म्हणजेच बारा वर्षांचा काळ पूर्ण केला असून सर्व सभासदांच्या सहयोगातून सेवाकार्याचे नवे क्षितिज आम्ही निश्चितच गाठू!” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांच्या हस्ते समाजातील वंचित घटकांना आर्थिक पाठबळ म्हणून विविध संस्था आणि व्यक्ती यांना धनादेश सुपूर्द करण्यात आले.

मान्यवरांचे विधिवत औक्षण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पुष्पवृष्टी करीत आणि पार्श्‍वगीताच्या सुरेल तालासुरात नूतन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. संगीता शाळिग्राम आणि विनय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपश्री प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.