थर्ड आय – अविनाश चिलेकर – लढाई पवार काका–पुतण्याची, मैदान पिंपरी चिंचवडचे

0
177

८४ वर्षांच्या शरद पवार यांची राजकारणातील ६० वर्षे आणि त्यांचे ६३ वर्षांचे सख्खे पुतणे अजित पवार यांची ३० वर्षांची कारकिर्द असा सामना दुसऱ्यांदा पिंपरी चिंचवडच्या मैदानात होणार आहे. लोकसभेला सेमीफायनल झाली, आता विधानसभा निवडणुकित अंतिम सामना आहे. बारामतीचे खरे दादा शरद पवार हेच असल्याचा कौल खुद्द बारामतीकरांनी दिला. आता पुन्हा त्याच तिकीटावर तोच खेळ आहे. लोकसभासाठी मैदान बारामतीचे होते, आता दादांचा बालेकिल्ला म्हणून त्यांचे लाडके पिंपरी चिंचवड शहरात दुसऱ्यांदा कुस्ती लागणार. साहेब अगदी ठामपणे सांगतात, जे लोकसभेला झाले तोच निकाल आता विधानसभेलाही दिसेल. शेवटी कितीही केले तरी शरद पवारांचा शब्द म्हणजे अनुभवाचे बोल. ते बोलतात ते करून दाखवतात आणि विरोधात अजितदादा सर्वांना बोट करून इशारा देत, मी तुला पाडणार, तू कसा जिंकतो तेच पाहतो अशा फुशारक्या मारत फिरतात.
अजित दादांमुळेच भाजपला मोठा फटका बसल्याचे महिन्यापूर्वी रा.स्व.संघाच्याच ऑर्गनायझर साप्ताहिकाने लेख लिहून सांगितले. संघाच्याच विवेक साप्ताहिकानेही महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाचा खापर अजितदादांचा संग असल्याचे सांगून टाकले. ते थोडे झाले म्हणून की काय, गुरुवारच्या बैठकित भाजपच्या कोअर टीम मध्येही अजितदादा नकोत, असा सूर उमटला. साडेसाती लागल्यासारखे सगळी नकार घंटा वाजू लागली. त्यातच दादांच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार पडले आणि अजित गव्हाणेंसारखा मोहरा २८ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेला. राजकारणात दादांची घसरगुंडी सुरू आहे. आता पिंपरी चिंचवडमध्ये नाव केलेल्या दादांना इथूनही हद्दपार करण्याचा काकांचा निश्चय दिसतो.

गव्हाणे यांच्या प्रवेशाने ताकद मिळालेल्या शरद पवार यांच्या पक्षाची पहिलीच मोठी सभा २० जुलै रोजी पिंपरीगावात होते आहे. हे शक्तीपरिक्षण यशस्वी झाले पाहिजे म्हणून साहेबांच्या समर्थकांचा प्रयत्न आहे. तिथे जी काही भाषणे होतील त्याला उत्तर देण्यासाठी दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी अजितदादांच्या समर्थकांचा मेळावा काळेवाडीत रागा लॉन्स मध्ये होणार आहे. काका-पुतण्याची सभा, मेळावा कोण किती गर्दी करते, कोण काय बोलते यावर पुढचे राजकारण ठरणार आहे. विधानसभेला तीनही जागा महायुतीकडून काढून घ्यायच्या आणि महाआघाडीचे उमेदवार विजयी करायचेच असा शरद पवार यांचा निग्रह आहे. दुसरीकडे महायुतीचेच तीनही आमदार होतील यासाठी अजितदादांचे अटोकाट प्रयत्न आहेत.

साहेब की दादा, पिंपरी चिंचवडकरांची चॉईस कोण –
बारामतीकरांनी शरद पवार यांना कौल दिला आणि दादांना रस्ता दाखवला. आता पिंपरी चिंचवडकर काय निकाल देणार याची प्रतिक्षा आहे. कोणाचे किती योगदान याची सहज तुलना केली तर शरद पवार यांनी या शहराच्या पायाभरणीसाठी जे केले त्याला तोड नाही. आणि २५ वर्षांत शहराचे पालक म्हणून अजित पवार यांनी ज्या पध्दतीने शहर विकासात लक्ष घातले आणि एक दर्जेदार राहण्यायोग्य शहर घडवले तेसुध्दा लोक विसरणार नाहीत. साहेबांना या नगराची पायाभरणी केली आणि दादांनी कळस चढवला. पुणे शहरात जे आले ते पिंपरी चिंचवड मध्ये आले त्याचे खरे श्रेय अर्थातच शरद पवारांना जाते. जेएनएनयूआरएम योजनेत शहर नव्हते ते शरद पवार यांनी घ्यायला लावले म्हणून तीन हजार कोटींची कामे झाली. मोदींच्या काळात १०० स्मार्ट सिटी मध्ये शहर नव्हते तिथेही साहेबांना शब्द टाकला आणि समावेश झाला म्हणून पाच हजार कोटींची कामे दिसली. हिंजवडी, तळवडे आयटी पार्क मुळे आजची शहराची भरभराट दिसते आणि ती दूरदृष्टी अर्थातच शरद पवार यांची होती, हे मान्य करावेच लागेल. प्रश्न आता लोक साहेब ज्यांना उमेदवारी देणार त्यांना मत देणार की दादांचा शब्द ग्राह्य माननार हा आहे.
शहरात आजवर सर्व पदांचे वाटप, निवड, नियुक्त्यांमध्ये अजितदादा जे सागत तेच होत आले. शरद पवार यांच्याकडे कोणी कार्यकर्ता पदासाठी गेला तरी ते त्याला अजितदादांकडे पाठवत, अशी पध्दत होती. परिणामी हजारो कार्यकर्त्यांवर दादांचे ऋण आहेत. इतके असूनही २०१७ मध्ये अजितदादांच्या हातातून महापालिका भाजपकडे गेली. २०१९ मध्ये मावळ लोकसभा निवडणुकित अजितदादांचे सुपूत्र पार्थ पवार यांना लोकांनी बिलकूल स्वीकारलेले नाही, हेसुध्दा लक्षात घेतले पाहिजे. अजितदादांनी भाजपच्या विरोधात राजकारण करून शहर कायम हातात ठेवले होते, आता ते आणि त्यांचा पक्ष भाजपच्या मांडिला मांडी लावून बसलेत. राजकारणातील हा विरोधाभास लोकांना आवडलेला नाही. म्हणूनच पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्यासाठी प्रचंड मोठी संधी आहे. पूर्वीच्या राष्ट्रवादीचे भय आणि भ्रष्टाचाराने बरबटलेले शासन, प्रशासन होते म्हणून लोकांनी भाजपला या शहरात संधी दिली. पाच-सात वर्षांत शहराची दुप्पट लूट झालेली लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. खरे तर, दादांची राष्ट्रवादी आणि भाजप हे आता एकाच रथात आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी मैदान साफ आहे, पाटी कोरी आहे आणि मालमसालासुध्दा भरपूर आहे. २० ला काकांच्या आणि २१ ला दादांच्या मेळाव्यातून कोण किती पाण्यात ते समजेल. साहेब तसे तेल लावलेले पैलवान आहेत आणि दादा सरळ घुसणारा आडदांड पैलवान आहे. कुस्ती प्रेक्षणीय आहे, मजा घ्या.