१९ जुलै (पीसीबी) भोसरी,
दुचाकीला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात 15 जुलै रोजी सायंकाळी क्वालिटी सर्कल चौक, भोसरी येथे घडला.
ओमकार नंदुकुमार घेवडेकर (वय 22, रा. चिखली) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी फिर्यादी घेवडेकर हे त्यांच्या दुचाकी (एमएच 14/एलसी 9491) वरून इंद्रायणीनगर भोसरी येथे बँकेत जात होते. क्वालिटी सर्कल चौकात आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात घेवडेकर गंभीर जखमी झाले. त्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.










































