भाजपच्या अधिवेशनाची बालेवाडीत जोरदार तयारी, विधानसभेसाठी व्यूहरचना ठरणार

0
80

पुणे, १९ जुलै (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरे जावे लागणाऱ्या भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशाचा शिक्का पासून टाकण्यासाठी चंग बांधला आहे. गेल्या साडेचार वर्षांत दुरावलेला संपर्क सेतु पुन्हा जोडण्यासाठी राज्यात काढल्या जाणाऱ्या संंवाद यात्रेची तयारी आणि विधानसभेसाठी व्यूहरचना, याचे आराखडे पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे रविवारी (२१ जुलै) होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात बांधले जाणार आहेत. त्यासाठी दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच उपस्थित राहणार असल्याने बालेवाडीत शाही बडदास्त ठेवण्यात आली आहे. मात्र, राज्यातील पराभवाचे चिंतन आणि मनन करताना शहा यांंच्याकडून पदाधिकाऱ्यांची कशी कानउघाडणी होणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. या अधिवेशनासाठी पुणे नगरी सज्ज झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाला विशेष महत्त्व आले आहे. त्यासाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. अतिविशेष व्यक्तींसाठी पंंचतारांकित हाॅटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्याबरोबरच शाही भोजनाचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनासाठी राज्य पातळीवरील ज्येष्ठ नेते हे तयारीचा आढावा घेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांंच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा असे आठ तासांंचे वेळापत्रक तयार झाले आहे. सकाळी दहा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांंवरील तयारीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या अधिवेशनात लोकसभेला राज्यात मिळालेल्या कमी प्रतिसादाबाबत चिंतन आणि मनन करण्याबरोबरच प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या निवास आणि भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या सर्व सत्रांंना अमित शहा हे दिवसभर उपस्थित राहून आढावा घेणार असल्याने थोडीही कमतरता राहू नये, यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांंकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

अमित शहांंच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यात सत्तांंतरानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मात्र, या घडामोडींंचा लोकसभेच्या निवडणुकीत फायदा न होता तोटाच झाल्याचे लक्षात आल्यावर भाजपकडून विधानसभेच्या निवडणुकांसाठी तयारीला वेग आला आहे. त्यासाठी राज्यभर संंवाद यात्रा काढली जाणार आहे. त्याची गावपातळीपासून राज्य पातळीवर कशी तयारी करायची, याबाबत अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शहा हे कोणती भूमिका मांडणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. सत्त्त्तांतर झाल्यापासून राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामाचा धांडोळा घेताना कोणते निर्णय चुकते, यावर शहा यांंच्याकडून कानउघाडणी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अजित पवारांंची संगतीवर भाष्य?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांंना महायुतीत सहभागी करून घेतल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांंमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीतही काही मतदार संघांंमध्ये त्याचे पडसाद उमटले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पवार यांंची साथ आवश्यक झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा हे अजित पवार यांंच्या संगतीवर भाष्य करून कार्यकर्त्यांंच्या मनातील संंभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.

पाच हजार पदाधिकारी
अधिवेशनाला सुमारे पाच हजार पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. मंंडल प्रमुखापासून ते राज्याच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांंना या अधिवेशनात मार्गदर्शन केले जाणार आहे. अमित शहा हे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधिवेशनात असणार आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याची व्यवस्था बालेवाडीमध्ये करण्यात आली असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले.स