खून आणि मोकाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सख्ख्या भावांना अटक

0
163

वाकड, दि. 18 (प्रतिनिधी)

१८ जुलै (पीसीबी) – एका व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने तळेगाव आणि आळंदी परिसरातून अटक केली. त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्यात आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

गणेश बाजीराव ढमाले (वय 36), अभिजित ऊर्फ ओंकार बाजीराव ढमाले (वय 29, रा. जुनी सांगवी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे रोजी औंध-रावेत बीआरटी रोडवर दुचाकी वरून आलेल्या आरोपींनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी पळवून गेले होते. त्यातील काही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली. मात्र आरोपी गणेश आणि अभिजीत हे फरार होते.

दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अन्वये कारवाई केली. मागील अडीच महिन्यापासून गणेश आणि अभिजीत हे फरार होते. गुन्हे शाखा युनिट चार ने आरोपींची माहिती काढून गणेश याला तळेगाव व परिसरातून तर अभिजीत याला आळंदी परिसरातून अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप सावंत, उपनिरीक्षक आबासाहेब किरनाळे, नारायण जाधव, सहायक फौजदार संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, पोलीस अंमलदार प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.