कामावरून काढून टाकल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण

0
136

महाळुंगे,दि. 16 जुलै (पीसीबी) – कामावरून सुट्टी झालेली नसताना कामगाराने मोबाईल मागितला असता त्याला मोबाईल दिला नाही, म्हणून त्याने सिक्युरिटी सुपरवायझर आणि एच आर यांना शिवीगाळ केली. त्यामुळे कामगाराला कामावरून काढून टाकले. त्या कारणावरून कामगाराने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून सिक्युरिटी सुपरवायझरला रात्यात अडवून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री आठ वाजताच्या सुमारास होरीबा कंपनी समोर, भांबोली येथे घडली.

शिवप्रसाद राजेश्वर त्रिपाठी (वय 36, रा. वासुली फाटा, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋत्विक राठोड (रा. झित्राईमळा, चाकण) आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्रिपाठी हे भांबोली येथील होरीबा कंपनीमध्ये सिक्युरिटी सुपरवायझर आहेत. आरोपी ऋत्विक हा मशीन ऑपरेटर म्हणून कामाला होता. कंपनीत कामगारांना फोन वापरण्यास मनाई असल्याने सर्व कामगार सिक्युरिटी केबिनमध्ये मोबाईल जमा करतात. 8 जुलै रोजी रात्री आठ वाजता त्याची कामावरून सुट्टी झालेली नसताना ऋत्विक याने त्याचा मोबाईल फोन मागितला. त्रिपाठी यांनी मोबाईल देण्यास नकार दिला. त्यावरून ऋत्विक याने फिर्यादी सिक्युरिटी सुपरवायझर आणि एचआर यांना शिवीगाळ केली. त्यावरून ऋत्विक याला कामावरून काढून टाकण्यात आले.

याचा राग मनात धरून 15 जुलै रोजी रात्री आठ वाजता त्रिपाठी कामावरून घरी जात असताना त्यांना ऋत्विक याने अडवले. ऋत्विक आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून त्रिपाठी यांना बेल्ट, काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.